औरंगजेबाची कबर हटवून बांधावे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांची मागणी

औरंगजेबाची कबर हटवून बांधावे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक

सोलापूर : प्रतिनिधी

क्रूरकर्मा औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अत्यंत हाल हाल करून मारले. त्यामुळे शासनाने औरंगजेबाची औरंगाबाद येथील कबर हटवून त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे स्मारक बांधावे आणि आपले हिंदुत्व सिद्ध करावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला दिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी औरंगाबाद येथील धर्मांध मुघल शासक औरंगजेब याच्या कबरीची पाहणी केली. कबरीच्या शेजारूनच एक व्हिडिओ प्रसारित करत जिल्हाप्रमुख बरडे यांनी ही मागणी केली आहे. श्री. बरडे म्हणाले, ज्याने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना अत्यंत क्रूरपणे ठार मारले त्या मुघल शासक औरंगजेबाची कबर सजवलेली पाहून मन अत्यंत उद्विग्न होत आहे. औरंगजेबाने आपले वडील, आपला भाऊ, मुले यांना ठार मारले. कहर म्हणजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचीही अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील सरकार हिंदुत्ववादी असल्याचे सांगतात. हे सरकार जर खरेच हिंदुत्ववादी असेल तर त्यांनी क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटवून तेथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे स्मारक करावे. औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती श्री संभाजी महाराज नगर आम्हीच केल्याचा दावा शिंदे फडणवीस सरकारकडून सातत्याने करण्यात येत आहे. या सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी औरंगजेबाची कबर हटवून तिथे शंभूराजांचे स्मारक करावे असेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे म्हणाले.