आत्मविश्वासाने सुदृढ असलेल्या दिव्यांग ममताला शैक्षणिक मदत
दिलीप कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त नवनाथ भजनावळे यांचा उपक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
शरीराने दिव्यांग असूनही आत्मविश्वासाने सुदृढ असणाऱ्या ममता थदाणी या विद्यार्थीनीस शैक्षणिक मदत देण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नवनाथ भजनावळे यांनी हा स्तुत्य उपक्रम राबविला.
दिव्यांग असणाऱ्या ममता थदाणी या विद्यार्थीनीस शैक्षणिक मदत म्हणून पाच हजार रुपयांचा धनादेश माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आला. दोन्ही हात व दोन्ही पाय नसूनही ममता थदाणीचे जिल्हाधिकारी बनण्याचे ध्येय आहे. जिद्दी ममता सध्या एम. ए. चे शिक्षण घेत आहे. तिच्या उज्वल वाटचालीस शुभेच्छा राहतीलच परंतु नेहमीच शैक्षणिक भविष्यासाठी कायम तिच्या पाठीशी राहु, असे श्री. कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नवनाथ भजनावळे यांनी केले होते. याप्रसंगी संजय शिंदे, मौलाना आझाद पॉलिटेक्निकचे संचालक अल्ताफ बुरहाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष सायबण्णा तेगळळी, ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भतगुणकी, मंगेश डोंगरे, बाळासाहेब सुरवसे, सनी चव्हाण, गणेश भोसले, उमाकांत निकम आदी उपस्थित होते.