सोलापूरकरांनी अनुभवला धमाल, संवेदना अन् जाणिवेचा त्रिवेणी संगम

उलगडली 'बाईपण भारी देवा' च्या पडद्यामागची कहाणी : 'प्रिसिजन गप्पा' ला रसिकांची दाद

सोलापूरकरांनी अनुभवला धमाल, संवेदना अन् जाणिवेचा त्रिवेणी संगम

सोलापूर : प्रतिनिधी

धमाल, संवेदना अन् सामाजिक जाणिवेचा त्रिवेणी संगम सोलापूरकर रसिकांनी शनिवारी अनुभवला. निमित्त होते श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात सुरू असलेल्या 'प्रिसिजन गप्पा' च्या दुसऱ्या दिवशी 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील कलाकारांसोबतच्या संवाद कार्यक्रमाचे.

'प्रिसिजन गप्पा' चा दुसरा दिवस ख्यातनाम अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी, चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याशी संवादाने रंगला. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर- जोशी यांनी कलाकारांना बोलते केले.

शनिवारी प्रारंभी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या कुलकर्णी, चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, प्रसिद्ध सूत्रसंचालक अभिनेत्री डॉ. समीरा गुजर- जोशी तसेच प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक करण शहा, संचालक रवींद्र जोशी, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयूरा शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, बाईपण भारी देवा चित्रपटातील प्रत्येक पात्र समाजातील सर्वसामान्य स्त्रीशी जोडले गेले आहे. यातील पात्रे, संवाद, कथानक हे महिलांना आपले वाटते. यामुळेच प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला आणि या चित्रपटाची प्रसिद्धी आमच्यापेक्षा अधिक प्रेक्षकांनीच केली.

रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, मला अभिनयाचे धडे वडिलांच्या प्रेरणेने बालनाट्यापासूनच मिळाले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतल्यानंतर अभिनय अधिक सकस झाला. बाईपण भारी देवा चित्रपटाच्या अतिशय वेगळ्या कथानकामुळे अभिनय करताना खूपच मजा आली. याप्रसंगी रोहिणी हट्टंगडी यांनी आपल्या अभिनयाच्या प्रदीर्घ प्रवासातील अनेक किस्से प्रेक्षकांना सांगितले.

अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अपघातांच्या मालिकेचे वर्णन सांगताना सभागृह सुन्न झाले. मनात आत्महत्येचे विचार येण्याची शक्यता निर्माण झालेली असताना आईने दिलेला आत्मविश्वास आणि रंगभूमीबद्दलची ओढ यामुळे इतका मोठा प्रवास मी करू शकले असे सुकन्या कुलकर्णी यांनी सांगताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट करून त्यांच्या अभिनय प्रवासाचे कौतुक केले. यावेळी सुकन्या कुलकर्णी यांनी बाई पण भारी देवा या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळचे विनोदी प्रसंग सांगून रसिकांना खळखळून हसवले.

महिला सबलीकरणाचा विषय केवळ गंभीरपणे न मांडता हलक्या फुलक्या पद्धतीनेही मांडता येतो हे यातून कळाले, असे अभिनेत्री डॉ. समीरा गुजर - जोशी यांनी सांगताच प्रेक्षकांनी टाळ्यांनी दादा दिली.

याप्रसंगी प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक करण शहा, संचालक रवींद्र जोशी, प्रिसिजन फाउंडेशनच्या संचालिका मयूरा शहा आदी उपस्थित होते.


----------
आज पारंपरिक राजस्थानी संगीताची मेजवानी

प्रिसिजन गप्पांमध्ये उद्या रविवारी राजस्थानी पारंपरिक संगीताचा मागोवा घेणारा 'पधारो म्हारे देस' हा कार्यक्रम सादर होणार आहे. जैसलमेर येथील राजस्थानी कलाकार बादल खान, मुलतान खान, कुटाला खान आणि हाकिम खान या कलाकारांशी संवाद साधत त्यांचा प्रवास जाणून घेण्यात येईल. तसेच यावेळी राजस्थानी संगीतही ऐकण्याची संधी सोलापूरकर रसिकांना मिळणार आहे.