जुळे सोलापुरात भरणार तीन दिवसीय कीर्तन महोत्सव
श्री मोरया प्रतिष्ठानचा उपक्रम : श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर : प्रतिनिधी
श्री मोरया प्रतिष्ठान आणि दत्त तारा ग्रुपतर्फे जुळे सोलापुरातील के. एल. ई. शाळेच्या मैदानावर १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
किर्तन महोत्सवात दररोज दुपारी ४ ते ५ हरिपाठ, सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत प्रवचन आणि सायंकाळी ७ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हरिकीर्तन होणार आहे.
किर्तन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १७) होणार आहे. पहिल्या दिवशी ह. भ. प. लक्ष्मण महाराज चव्हाण यांचे प्रवचन होणार असून ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांचे कीर्तन होईल. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१८) ह. भ. प. रमेश महाराज शिवापुरकर यांचे प्रवचन होईल तर श्री संत माणकोजी बोधले महाराज यांचे वंशज श्रीगुरु ह. भ. प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन होईल.
रविवारी (दि. १९) किर्तन महोत्सवाचा समारोप होणार आहे. या दिवशी ह. भ. प. दत्तात्रय महाराज भोसले यांचे प्रवचन होणार असून श्री गुरुवर्य गुरुजी बुवा राशिनकर फडाचे विद्यमान वंशज श्रीगुरु ह. भ. प. हरी महाराज राशिनकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. दररोज कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
रविवारी (दि.१९) सायंकाळी ६ वाजता जुळे सोलापूर परिसरातून भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात वारकऱ्यांच्या टाळ पथक, झेंडा पथकासह, घोडे उंट यांचाही समावेश राहणार आहे. ही दिंडी मिरवणूक के. एल. ई. शाळेपासून सुरुवात होऊन पुन्हा त्याच ठिकाणी विसर्जित होणार आहे. यातील तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा, असे आवाहन श्री मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश काळे यांनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेस विपुल भोपळे, आदिश शिंदे, रोहित बिराजदार, मुकुंद ताकमोगे आदी उपस्थित होते.