मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनीष काळजे यांच्या शिफारशीने दिला भरीव निधी

मुख्यमंत्री विशेष निधीतील विकासकामांचे धडाक्यात उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनीष काळजे यांच्या शिफारशीने दिला भरीव निधी

सोलापूर : प्रतिनिधी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून तसेच इतर निधीमधून सोलापूर शहरात करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन रविवारी शिवसेना शहरप्रमुख मनोज शेजवाल, उपजिल्हाप्रमुख सुरेश कोकटनूर यांच्या हस्ते आणि जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या निधीकरिता शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी पाठपुरावा केला होता.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून अंत्रोळीकर नगर येथील नागदेव घर ते पवार घरापर्यंत रस्ता करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून मोदी येथील शिवाजीनगर मधील म्हाडा अपार्टमेंटसमोरील सिमेंट रस्ता करणे, सोलापूर महानगरपालिका मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या दाराशा हॉस्पिटलचे नूतनीकरण करणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरीतन अभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून मार्कंडेय हॉस्पिटल परिसरात अंतर्गत रस्ता करणे, कल्पना नगर अंतर्गत पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी व रस्ता करणे, साईप्रसाद किराणा दुकानपर्यंत सिमेंट रस्ता या कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी शिवसेना शहरप्रमुख मनोज शेजवाळ म्हणाले, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा लौकिक आहे. सोलापूर शहरातील तळागाळातील नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी त्यांनी आजवर अनेक विकासकामे केली आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेषतः सोलापूर शहरासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळातही सोलापूर शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून आणण्यात येणार आहे. या कार्यक्रमास शिवसेनेचे विविध पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.