रतन टाटा आले होते सोलापुरात
कधी ? कुठे?....वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी सोलापूरला भेट दिल्याची आठवण काही मोजक्या सोलापूरकरांच्या मनात आहे. १५ मे १९९२ रोजी रतन टाटा सोलापूरात आले होते अशी माहिती विकास सहकारी बँकेचे चेअरमन कमलकिशोर राठी यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला दिली.
सर रतन टाटा यांनी सोलापूरला भेट दिली होती हे अनेक जणांना माहिती नाही. बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंटच्या उद्घाटनानिमित्त १५ मे १९९२ रोजी ते सोलापूरला आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापुरातील प्रसिद्ध चादर उत्पादक चंडक बगीच्यातील श्री रामकिसनजी राठी यांच्या निवासस्थानी भेट देऊन दोन तास तिथे सर्वांसमवेत व्यतीत केले. श्री रामकिसनजी राठी यांचे जावई डॉक्टर प्रकाश डाळे हे बार्शी येथील नर्गिस दत्त हॉस्पिटल ला कॅन्सर सर्जन म्हणून त्यावेळी होते व अजूनही कार्यरत आहेत. त्यांच्या संपर्कामुळे सोलापुरात श्री रतन टाटा यांच्या विमानाला दोन तास अवधी असल्याने त्यावेळी त्यांनी ही भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत डॉ. होमी सेठना हे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ देखील होते. पोखरण येथे ज्यावेळी पहिली अणुचाचणी झाली त्यावेळी डॉ. होमी सेठना हे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते, हे विशेष. श्री. नोएल टाटा जे रतन टाटा याचे वारस म्हणून गणले जातात तसेच श्रीमती सिमोन टाटा ज्या त्यांच्या सावत्र माता होत्या त्या देखील सोबत होत्या, असेही श्री. राठी यांनी सांगितले.
सर रतन टाटा यांनी यावेळी त्यांना भेट दिलेल्या सोलापूर चादरीबद्दल तपशीलवार माहिती घेतली होती. या चादरी इतक्या टिकाऊ व सुंदर बनतात हे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी श्री रामकिसनजी राठी यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. ही आठवण विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष व श्री रामकिसन राठी यांचे सुपुत्र कमलकिशोर राठी यांनी आवर्जून सांगितली.