शिवछत्रपतींची अद्वितीयता चित्रपटातून मांडण्यासाठी शिवराज अष्टकाची निर्मिती

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर : जनता बँक बौद्धिक व्याख्यानमालेचा समारोप

शिवछत्रपतींची अद्वितीयता चित्रपटातून मांडण्यासाठी शिवराज अष्टकाची निर्मिती

सोलापूर : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज हे अद्वितीय योध्ये होते. त्यांची अद्वितीयता चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी शिवराज अष्टकाची निर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन प्रख्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले.

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेचा समारोप श्री. लांजेकर यांच्या प्रकट मुलाखतीने झाला. अभिनेते ॲड. आनंद देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आठ चित्रपट काढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. यातील फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज हे चार लोकप्रिय चित्रपट बनवले आहेत. या 'शिवराज अष्टक' या विषयावर ॲड. देशपांडे यांनी श्री. लांजेकर यांना बोलते केले.

श्री. लांजेकर म्हणाले, वयाच्या नवव्या वर्षापासून ज्येष्ठ इतिहास संशोधक निनादराव बेडेकर यांच्यासोबत राहुन खूप काही शिकता आले. ४० वर्षांपूर्वी भालजी पेंढारकर यांनी श्री शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर चित्रपट तयार केले. मात्र त्यानंतरच्या काळात ऐतिहासिक चित्रपट चालणारच नाहीत असा समज झाल्याने या विषयांवर काम करण्याचे धाडस कोणी केले नाही. आम्ही नफ्या -तोट्याचा विचार न करता श्री शिवछत्रपतींच्या आयुष्यावर भव्यदिव्य चित्रपट करायचा, असा निर्धार करून फर्जंद चित्रपटाची निर्मिती केली. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरही जनतेने या चित्रपटाला डोक्यावर घेतले.

ऐतिहासिक चित्रपटांतील पात्रांसाठी अभिनेते, अभिनेत्री निवडताना अनेक निकष लावून निवड केली. श्री शिवछत्रपतींच्या आयुष्यावरील चित्रपट सर्वार्थाने चांगला व्हावा, यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना रसिक चांगली दाद देत आहेत. याचे समाधान वाटते, असेही श्री. लांजेकर यावेळी म्हणाले.

सोनाली जोशी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग, उपाध्यक्ष सुनील पेंडसे, बँकेचे संचालक पुरुषोत्तम उडता, आनंद कुलकर्णी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, व्याख्यानमाला समितीचे प्रमुख मदन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

..................
अन् शिवशाहीरांच्या डोळ्यांत आले पाणी.....
फर्जंद चित्रपट तयार झाल्यानंतर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना हा चित्रपट दाखवण्यात आला. चित्रपट पूर्ण होताच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले, अशी आठवण मुलाखतकार अभिनेते ॲड. आनंद देशपांडे यांनी यावेळी सांगितली.