अलर्ट ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सावधगिरीच्या सूचना
आपत्ती आल्यास जिल्हा प्रशासनाने रहावे तयारीत
सोलापूर : प्रतिनिधी
पुढील चार - पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनांना सावधगिरी बाळगण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
मोठ्या पावसाच्या शक्यते संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार रहावे, असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिण दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सोलापूर शहर जिल्ह्यातही पावसाने मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे. काल बुधवारी दिवसभर तसेच रात्रीही शहरात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. तसेच घरांमध्ये शेतामध्ये पाणी शिरले आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने याबाबत खबरदारी घ्यावी असे राज्य शासनाने जिल्हा प्रशासनांना कळविले आहे.
-------------
सोलापूरात मोठा पाऊस
दोन दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढला आहे. सतत प्रचंड पाऊस पडत असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी सात साचत आहे. गणेशोत्सव आणि सोलापूरातील पाऊस हे जणू समीकरण बनले आहे. परंतु यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने सोलापूरकरांना घराबाहेर पडणेही अवघड बनले आहे. गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस देखावे पाहण्यासाठी खुले होतात. परंतु सततच्या पावसामुळे या संख्येवरही मोठा परिणाम जाणवत आहे.