'डाएट प्लान' जीवनशैली बनली तर सकारात्मक परिणाम निश्चित

डॉ. जगन्नाथ दीक्षित : जनता बँक बौद्धिक व्याख्यानमालेचे उद्घाटन

'डाएट प्लान' जीवनशैली बनली तर सकारात्मक परिणाम निश्चित

सोलापूर : प्रतिनिधी
वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह मुक्तीसाठीचा 'डाएट प्लान' हि जीवनशैली बनली तर सकारात्मक परिणाम निश्चितपणे दिसून येतील, असे प्रतिपादन बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेचे उद्घाटन गुरुवारी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते झाले.

'जीवनशैली बदलातून वेट लॉस व मधुमेह मुक्ती' या विषयावर डॉ. दीक्षित यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. प्रारंभी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष वरदराज बंग, उपाध्यक्ष सुनील पेंडसे, संचालक प्राचार्य गजानन धरणे, ॲड. प्रदीपसिंह राजपूत, सी.ए.गिरीष बोरगावकर, पुरूषोत्तम उडता, राजेश पवार, आनंद कुलकर्णी, अजित देशपांडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, व्याख्यानमाला समितीचे प्रमुख मदन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. दीक्षित म्हणाले, जगात उपासमारीमुळे झालेल्या मृत्यूपेक्षा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. अधिक खाणे आवश्यक नसतानाही आपण खातो. हे चुकीचे आहे. सततच्या खाण्यामुळे इन्शुलिनचे प्रमाण वाढते. परिणामी उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, रक्तातील चरबी वाढते. इन्शुलिनचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी कमी वेळा खाणे उत्तम ठरते.

कोणता डाएट प्लॅन यशस्वी होईल ?असे लोक नेहमी विचारतात. एकही पैसा लागू नये, डॉक्टरांची आवश्यकता लागू नये, कोणतेही यंत्र विकत आणावे लागू नये, कोणताही पोषक पदार्थ विकत आणावा लागू नये आणि आयुष्यभर आनंदाने पाळता यावा असा डाएट प्लॅन नक्की यशस्वी होईल, असेही प्रा. डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जागृती देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर पवन शेंडे यांनी आभार प्रदर्शन केले.
...........................

डॉ. दिक्षित यांच्या ' टिप्स '
१) कडक भुकेच्या दोन वेळा ओळखा व त्याचवेळी जेवा.
२) दोन जेवणांच्या मध्ये काहीही खाऊ नका.
३) ४५ मिनिटांत ४.५ किमी चाला किंवा १५ किमी सायकल चालवा.
४) जेवताना शक्यतो गोड कमी खा किंवा टाळा.
५) सतत खाऊ नका.
.............
आजचे व्याख्यान
शुक्रवार, २ सप्टेंबर २०२२
वक्ते - प्रमोद बापट, मुंबई (पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)
विषय - स्वराज्याचा अमृत महोत्सव
---------