भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षपदी 'यांची' लागली वर्णी
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी निवड केली जाहीर
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ही निवड पत्राद्वारे जाहीर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे आपण पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या घेऊन पक्ष संघटना वाढीसाठी कार्यरत आहात. आपल्या सामाजिक व राजकीय अनुभवाचा उपयोग पक्ष संघटनेच्या कार्यवाढीसाठी निश्चितपणे होईल. आपण ही जबाबदारी सर्वांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पाडाल असा मला विश्वास आहे.
भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होते ? याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांसह इतरांचेही लक्ष लागून राहिले होते. अनेक तालुक्यांतून जिल्हाध्यक्षपदासाठी मागणी होत होती. अखेर मंगळवारी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची वर्णी लागल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार कल्याणशेट्टी यांना जिल्हाध्यक्षपद दिल्याने सोलापूर जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पकड अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.