नोकरी मागणारे नको तर नोकरी देणारे व्हा !

डॉ. सुहास पेडणेकर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात

नोकरी मागणारे नको तर नोकरी देणारे व्हा !

सोलापूर : प्रतिनिधी
परंपरा, संस्कृती आणि मानवी मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यांनी करावी. देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्याचा आजचा काळ ही विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नको तर नोकरी देणारे बनावे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १८ वा दीक्षांत समारंभ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ प्रांगणात उत्साहात झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुहास पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव डॉ. योगिनी घारे,
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रारंभी विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीपासून दीक्षांत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणापुर हे ज्ञानदंड हाती घेऊन अग्रभागी होते. या मिरवणुकीमध्ये मान्यवरांसह पदवी स्वीकारणारे स्नातक दीक्षांत सोहळ्यासाठीचा बाराबंदीचा विशेष पोशाख परिधान करुन सहभागी झाले होते. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.


यावेळी कुलसचिव डॉ. योगीनी घारे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. याप्रसंगी एकूण १७ हजार १९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याचबरोबर ५० संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी) पदवी तर ५७ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी देण्याची विनंती केल्यानंतर कुलगुरूंनी पदवी बहाल करत असल्याचे घोषित केले.

डॉ. पेडणेकर म्हणाले, जग झपाट्याने बदलत आहे. नवीन क्षेत्रे खुली होत आहेत. ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांनी अपयश आले तरी प्रयत्न न सोडता आपल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कार्यरत रहावे. सर्वच क्षेत्रात चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता असते. अशावेळी ही गरज ओळखून विद्यार्थ्यांनी शिक्षणातून देशप्रेम, आत्मनिर्भरता मिळवावी आणि आपल्या क्षेत्रात चांगले नेतृत्व करावे, असेही मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या, स्वत:चे ध्येय काय आहे, याचे अवलोकन प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले महान कार्य अभ्यासावे. गुणवत्तेबरोबर ज्ञानाने संपन्न होणे हे सर्वांचे ध्येय असले पाहिजे असेही कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.


राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.  या सोहळ्यासाठी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, सुवर्णपदकाचे देणगीदार, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. श्रुती देवळे यांनी केले. आभार कुलसचिव डॉ. योगिनी घारे यांनी मानले.