सोलापूरकरांना चाहूल गड्डा यात्रेची

होम मैदानावर स्वच्छतेस सुरुवात

सोलापूरकरांना चाहूल गड्डा यात्रेची

सोलापूर : प्रतिनिधी

तब्बल ८०० वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूरच्या गड्डा यात्रेची चाहूल सोलापूरकरांना लागत आहे. ऐतिहासीक होम मैदानावर स्वच्छतेच्या कामास सुरुवात झाली आहे.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा हा सोलापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यातील भाविकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. यंदाचीही यात्रा जानेवारी महिन्यात होणार आहे. कोरोनाच्या महामारीमुळे यात्रा पूर्ण संख्येने होऊ शकली नव्हती. यंदा श्री सिध्दरामेश्वर यात्रा मोठ्या संख्येने होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गड्डा यात्रेत होम मैदानावर पाळणे, खाद्य पदार्थांची दुकाने, खेळण्यांची दुकाने, कपड्यांची दुकाने तसेच गृहपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जातात. यात्रेत लाखो भाविक होम मैदानावर फेरफटका मारतात.

तसेच या मैदानावर दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा सोलापूर आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्यातर्फे ५२ वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन २९ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात हजारो शेतकरी भेट देतात.

सोलापूरकरकर गड्डा यात्रा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यासाठी होम मैदानाची स्वच्छता करण्यात येत आहे. ज्या मार्गावरून नंदीध्वज येणार आहेत तो मार्ग स्वच्छ करण्यात येत आहे. काटेरी झुडपे काढणे, दगड उचलणे, गवत काढणे अशीही कामे सुरु आहेत.