गणरायाचे घरोघरी मंगलमय वातावरणात आगमन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही उत्साहात प्रतिष्ठापना

गणरायाचे घरोघरी मंगलमय वातावरणात आगमन

सोलापूर : प्रतिनिधी

सर्वांच्या लाडक्या विघ्नहर्ता, गणरायाचे गुरुवारी घरोघरी मंगलमय वातावरणात आगमन झाले. तसेच शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही 'श्रीं' ची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.

श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हिंदू बांधवांनी सर्वत्र गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. बाप्पांची मूर्ती खरेदी, पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू, मिठाई खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. श्री कसबा गणपती, श्री दगडूशेठ गणपती, श्री लालबागचा राजा अशा अनेक रूपातील मूर्तींना गणेशभक्तांची पसंती मिळाली.

शहरातील श्रीमंत मानाचा कसबा गणपती, श्री सदानंद समाज आजोबा गणपती ट्रस्ट, पाणीवेस तालीम, पत्रा तालीम, थोरला मंगळवेढा तालीम, वस्ताद गणपती, दशभुजा गणपती, अय्या गणपती, सुवर्ण गणपती युवक प्रतिष्ठान, दादा गणपती, छत्रपती ग्रुप शेकडो मंडळांनी बाप्पांची उत्साहात प्रतिष्ठापना केली. यातील श्रीमंत मानाचा श्री कसबा गणपती मंडळासह काही मंडळांनी मिरवणूक काढून बाप्पांना विराजमान केले. यावेळी कसबा गणपतीच्या पथकाने बहारदार लेझीमचे डाव सादर केले.

शहरातील इंडियन मॉडेल स्कूल, ज्ञान प्रबोधिनीसह अनेक शाळांमध्ये लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. इंडियन मॉडेल स्कूलची प्रतिष्ठापनेची मिरवणूक दिमाखात काढण्यात आली. या मिरवणुकीत शाळेच्या मुलांचे लेझीम, ढोल - ताशा पथक, झांज पथक, वारकरी पथक सहभागी झाले होते.