सोलापूरच्या विमानसेवेबाबत पालकमंत्री रविवारी घेणार बैठक

सोलापूर विकास मंचाची माहिती

सोलापूरच्या विमानसेवेबाबत पालकमंत्री रविवारी घेणार बैठक

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरच्या सर्व दैनंदिन घडामोडींवर माझे बारकाईने लक्ष असून योग्य वेळ आल्यावर जिल्हा प्रशासनाला योग्य तो आदेश करेन. तसेच होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होण्यासाठी रविवार (दिनांक ४ डिसेंबर) रोजी ह्या विषयाशी संबंधित सर्व प्रमुख अधिकार्‍यांसमवेत शासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव, गणेश पेनगोंडा आणि रोहित मोरे यांना सांगितले आहे अशी माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांनी दिली.

बुधवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी गेल्या २५ दिवसांपासून सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होई पर्यंत चक्री उपोषण, त्यानंतर घडलेल्या अपप्रचार, अप्रिय घटना आणि उद्भवलेल्या स्थिती ह्या विषयावर महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत प्रदिर्घ चर्चा सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी मुंबई येथील रॉयल स्टॉन ह्या शासकीय बंगल्यात केली. 


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या मुंबई येथील मुख्यालयात अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू होण्या विषयीची सविस्तर माहिती सोलापूर विकास मंचच्या सदस्यांकडुन बैठकीत जाणुन घेतली. सदर प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विमानसेवेचा विषय केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंधिया आणि ह्या विषयाशी संबधीत केंद्राच्या सर्व विभागांशी मी व्यक्तीगत पाठपुरावा करून हा विषय त्वरित मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव, गणेश पेनगोंडा आणि रोहित मोरे यांना आश्वस्त केले.