अधिक ऑक्सिजन देणाऱ्या ५२ झाडांचे रोपण

लॉकडाऊन सकारात्मक

अधिक ऑक्सिजन देणाऱ्या ५२ झाडांचे रोपण

सोलापूर : प्रतिनिधी

विशालनगर गणेशोत्सव मंडळाने लॉकडाऊनचा सदुपयोग करत अधिक ऑक्सिजन देणाऱ्या ५२ देशी झाडांचे रोपण केले.
जुळे सोलापूर येथील विशालनगर गणेशोत्सव मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी विशालनगरला हरितनगर बनवण्याचा विडा उचलला आहे. यासाठी लॉकडाऊनच्या काळात येथील तरुणांनी संकटाचे संधीत रूपांतर केले आहे.

सध्या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन शिक्षण चालू असल्याने मंडळाचे कार्यकर्ते सध्या घरीच आहेत. त्यानंतरच्या फावल्या वेळेत नेहमीप्रमाणेच काहीतरी समाजोपयोगी उपक्रम राबवायचा विचार कार्यकर्त्यांना सुचला.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. रुग्णांना ऑक्सिजनची उपलब्धता मात्र होत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत. ही समस्या लक्षात घेऊन अंकुर येळीकर यांच्या नेतृत्वाखाली मयुर पानकर, सुरज शाहबादे, समर्थ गौडगाव, सुयश बिराजदार, गुणमय काकडे, रणजित पानकर, निपुण कुठेकर, तसेच निनाद पाटील या कार्यकर्त्यांनी ऑक्सिजन देणारी झाडे लावण्याचा तसेच पक्षी व प्राण्यांसाठी जलकुंभ ठेवण्याचा निर्णय घेतला.

श्रमदानासाठी दररोज सकाळी व संध्याकाळी कार्यकर्ते एकत्र येत असत. प्रथम नगरामध्ये श्रमदानातून ५२ खड्डे घेण्यात आले. त्या खड्ड्यांमध्ये १७ कडुनिंब , ३ वड, ५ पिंपळ, ६ ताम्र वृक्ष, ६ रेन ट्री, ५ पळस, २ नोनी, ३ बुच, १ गुलमोहर, १ औदुंबर, १ मलबार कडुनिंब, १ चेरी, १ कदंब अशा एकुण ५२ वृक्षांचे रोपण करण्यात आले.

ज्यांच्या घरासमोर झाड आहे त्यांनी त्या वृक्षांचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी घेतली. तरुणांच्या कार्यास सहकार्य म्हणून प्रभागाचे नगरसेवक उपमहापौर राजेश काळे यांनी १० ट्री-गार्ड उपलब्ध करून दिले. 

सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे प्राणी व पक्षांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासते. पक्ष्यांसाठी नगरातील झाडांवर मातीचे छोटे जलपात्र बांधण्यात आले. तर प्राण्यांसाठी सिमेंटचे मोठे जलकुंभ ठेवण्यात आले. या तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यात विशालनगर मधील सर्वच रहिवासी आपापली जबाबदारी पार पाडत सहकार्य करीत आहेत.
-------------------
इतरांनीही राबवावा उपक्रम
विशालनगर गणेशोत्सव मंडळ केवळ गणेशोत्सव काळातच नाही तर वर्षभर विविध उपक्रम राबविते. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळातसुद्धा आम्हा तरुणांच्या हातून काहीतरी समाजसेवा घडावी या हेतूने हा उपक्रम राबविला आहे. यातून ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार आहे. इतरांनीही याचे अनुकरण करावे.
 -- अंकुर येळीकर, आधारस्तंभ, विशाल नगर गणेशोत्सव मंडळ