लोकशाहिरांच्या सुनेच्या हस्ते होणार जयंतीदिनी सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन
नगरसेवक सुनिल कामाठी यांची माहिती : ७९ लाख रुपयांची मंजुरी
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये बांधण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक सुनिल कामाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी (ता.१ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता पाथरूट चौकाजवळील अण्णाभाऊ साठे नगर, मातंग वस्ती येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या सांस्कृतिक भवनासाठी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने आणि नगरसेवक सुनिल कामाठी यांच्या प्रयत्नांतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा सन २०२०-२१ च्या निधीतून हे काम करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख असणार आहेत. तर महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिकेचे सभागृहनेते शिवानंद पाटील, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे तसेच मातंग समाजाचे पंच भोलेनाथ साबळे, संभाजी डुकरे, अनिल साठे, दत्ता अडसूळे, बाळू गायकवाड, लालू साठे, सुधाकर अडसूळे, दत्ता कांबळे, विजय अडसूळे, संजय साठे, राम बोराडे, सतीश गायकवाड, राज क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पत्रकार परिषदेस विजय अडसूळे, संजय साठे, यतीराज अडसूळे, परशुराम साठे, सतीश अडसूळे, निलेश गायकवाड, शुभम कांबळे, रुपेश साठे आदी उपस्थित होते.
या असतील सुविधा
या दोन मजली सांस्कृतिक भवनामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प साकारण्यात येणार आहे. तसेच प्रशस्त हॉल, कार्यालय, भव्य व्यासपीठ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.