पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले सोलापूरशी त्यांचे नाते !

काय म्हणाले पंतप्रधान मोदी ? वाचा : कुंभारी येथील रे नगर गृह प्रकल्पातील १५ हजार सदनिकांचे वितरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले सोलापूरशी त्यांचे नाते !

सोलापूर : प्रतिनिधी

माझा सोलापूरशी जुना ऋणानुबंध आहे. सोलापूर माझ्या हृदयात आहे, असे हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरात म्हणाले. 

सोलापुरातील असंघटित कामगारांसाठीच्या कुंभारी येथील ३६५ एकरावरील रे नगर गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या १५ हजार २४ सदनिकांचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार रणजिसिंह नाईक - निंबाळकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार नरसय्या आडम उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अहमदाबाद आणि सोलापूरचे एक वेगळे नाते आहे. ही दोन्ही शहरे टेक्स्टाईल उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. अहमदाबाद शहरातही पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. माझ्या सामाजिक जीवनात अहमदाबाद शहरातील पद्मशाली बांधवांनी अनेकदा माझ्या भोजनाची सोय केली आहे. सोलापुरातील काही हितचिंतकांनी ॲड. लक्ष्मणराव इनामदार यांची प्रतिमा असलेले वॉल हैंगिंग मला भेट म्हणून दिले आहे, हे माझ्या अजून स्मरणात आहे. सोलापूर माझ्या हृदयात आहे. चादरीसाठी प्रसिद्ध असलेले सोलापूर गणवेशांसाठीही लोकप्रिय होत आहे. सोलापुरातील एक हितचिंतक माझ्यासाठी कायम जॅकेट शिवून पाठवत असतात. भाजप सरकारने आजवर केलेला विकासकामांची माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रसंगी दिली. यावेळी 'मोदी की गॅरंटी' या शब्दावर पंतप्रधानांनी भर दिल्याचे दिसले.

प्रारंभी सुनिता मुद्यप्पा जगले, लता विजय दासरी, रिजवाना इस्माईल मकानदार, बाळुबाई वाघमोडे आणि लता मनोहर आडम या पाच लाभार्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चाव्या प्रदान करण्यात आल्या. उर्वरित १५ हजार घरांचे बांधकामही लवकरच पूर्ण होणार असून प्रधानमंत्री आवास योजनेतील (शहरी) ३० हजार घरांचा हा देशातील सर्वांत मोठा प्रकल्प ठरणार आहे. स्वच्छता कर्मचारी, विडी कामगार, बांधकाम कामगार, वस्त्रोद्योग कामगार अशा असंघटित क्षेत्रातील कामगारांना ही घरे मिळत आहेत.
---------
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते. चाव्या द्यायला मीच येईन असे म्हणाले होते. आज त्याची पूर्तता झाली. श्रीराम मंदिराचेही भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले होते. आता मंदिरही पूर्णत्वास येत आहे. त्यांच्या नेतृत्वात देशाच्या विकासात आम्हाला सहभागी होता येत आहे, याचे समाधान आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-------
मोदी उवाच.....
*प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक लाखाहून अधिक लोकांचा गृहप्रवेश २२ जानेवारी रोजी होत आहे. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने या सर्व एक लाख घरांमध्ये रामज्योत प्रज्वलित करावी....

*विकसित भारतासाठी आत्मवृत्त भारत बनणे आवश्यक

*माझ्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत हिंदुस्थान जगात अर्थव्यवस्थेत तिसरा क्रमांकावर असेल.
------------
पंतप्रधान झाले भावूक.....
अतिशय चांगल्या प्रकारची घरे येथे बांधण्यात आली आहेत. मलाही लहानपणी अशा प्रकारचे घर मिळायला हवे होते, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षण भावुक झालेले दिसले.

---------------

दायमा आणि मेहतांनी सांगितली आठवण

भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा आणि माजी नगरसेवक बाबुभाई मेहता यांनी २०१२ साली पंतप्रधान (तत्कालीन मुख्यमंत्री) नरेंद्र मोदी यांना गुजरात मधील गांधीनगर येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्रतिमा असलेले सोलापूरचे वॉल हैंगिंग भेट दिले होते. यावेळी त्यांनी वॉल हैंगिंगच्या निर्मिती प्रक्रियेविषयी माहिती घेऊन आनंद व्यक्त केला होता, अशी आठवण सांगतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा उल्लेख आपल्या भाषणात केल्यामुळे श्रीनिवास दायमा आणि बाबुभाई मेहता यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' शी बोलताना आनंद व्यक्त केला.