मोदींच्या दौऱ्यानंतर शहर भाजपमध्येच सुरू झाला गोंधळ

सरचिटणीसांनी केला थेट शहराध्यक्षांवर आरोप ! वाचा नेमके काय घडले ?

मोदींच्या दौऱ्यानंतर शहर भाजपमध्येच सुरू झाला गोंधळ

सोलापूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यामुळे नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच शहर भाजपमध्ये मात्र जोरदार वाक् युद्ध पेटले आहे. भाजपच्या सरचिटणीसांनी थेट शहराध्यक्षांवरच आरोप केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

भाजपाचे शहर सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी मला सरचिटणीस म्हणून पुढील रांगेतील पास मिळणे अपेक्षित होते. परंतु शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मला वॉरियर्स पास दिला. त्यावेळी माझा सरचिटणीस पदाचा पास कुठे आहे असे मी विचारले असता त्यांनी हाच पुढील रांगेतील पास आहे असे मला सांगितले. परंतु कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर मात्र हे कुठले पास ?  फेकून द्या असे पोलिसांनी उंच स्वरात मला सांगितले. मी सरचिटणीस असूनही कार्यकारणीतील सरचिटणीसाला शहर अध्यक्षांनी जाणून-बुजून फसवले. जे पक्षहितासाठी काम करतात त्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या बगलबच्चाना व्हीव्हीआयपी पास दिले गेले. त्यामुळे शहराध्यक्षांचा निषेध करतो. भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर हा अन्याय आहे. मी याबाबत व्यक्त होत असलो तरी अनेक पक्ष कार्यकर्त्यांच्या भावना अशाच आहेत, असा आरोप भाजप सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी केला आहे.

पक्षाचे काम करत असताना जबाबदारीने करा असे सांगितले जाते. परंतु ज्या पदाला सन्मान हवा तिथे खड्यासारखे फेकणाऱ्या अध्यक्षांची कार्यशैली संशय निर्माण करते. परंतु आमच्या विश्वनेत्यांची सभा सेक्टर दोनमध्ये बसून तमाम जनतेसोबत ऐकण्याच्या संधीचे आम्ही सोने केले, अशी पोस्ट सोशल मीडिया वरती लिहून सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यावर आरोप केले आहेत.

शिस्तीचा पक्ष असल्याचे सांगणाऱ्या भाजपामध्ये चक्क सरचिटणीसांनीच शहराध्यक्षांवर सोशल मीडियामधून असे आरोप केल्याने राजकीय क्षेत्रासह नागरिकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे सरचिटणीस पदाला उचित सन्मान देणे अपेक्षित होते, अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत.

लोकसभा निवडणूकीची धामधूम अवघ्या काही आठवड्यांनी सुरू होणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर मात्र भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच या प्रकरणातून दिसून येत आहे.

शहर भाजपामध्ये माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यात असलेले पक्षांतर्गत असलेले राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही गटांच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या गटावर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडली जात नाही हा आजवरचा इतिहास आहे. अशातच माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे निकटवर्तीय अशी प्रतिमा असलेल्या शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यावर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे निकटवर्तीय अशी प्रतिमा असलेले सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी सोशल मीडियातून आरोप केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना, राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन लोकसभेचे रण जिंकण्याची तयारी करत असतानाच शहर भाजपमध्ये मात्र पक्षांतर्गतच युद्ध पेटले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यातच असताना भाजपमधील हा वाद चव्हाट्यावर आला आहे.
-------------
शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणतात.....

पक्षकार्यात काही जणांना न्याय देताना काही जणांना अन्याय होत आहे असे वाटू शकते. परंतु तसे नसते. संघटनेसाठी सर्व कार्यकर्ते सारखेच आहेत.
--- नरेंद्र काळे, शहर अध्यक्ष, भाजपा, सोलापूर