सोलापूरात युवासेना पदाधिकाऱ्यांचेे सामूहिक राजीनामे

शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

सोलापूरात युवासेना पदाधिकाऱ्यांचेे सामूहिक राजीनामे

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. माजी युवासेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या समर्थनार्थ हे राजीनामे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तत्कालीन युवा सेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांना  हटवून त्या ठिकाणी बालाजी चौगुले यांची युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर काळजे यांच्या समर्थनार्थ युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. आता हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यस्तरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता सोलापूरातही उमटू लागले आहेत. मनिष काळजे यांना समर्थन देण्यासाठी युवा सेना शहराध्यक्ष अर्जुन शिवसिंगवाले, 
युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप भरमशेट्टी, युवा सेना सोलापूर जिल्हा कॉलेज कक्ष प्रमुख सुजित खुर्द, अक्कलकोट सरचिटणीस अजय राठोड  या सर्व युवा पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहेत. पदांचे राजीनामे दिलेले असले तरी एकनाथ शिंदे आणि मनीष काळजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात आता राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

--------------

आम्ही शिवसेनेसोबतच

माझ्यासह युवा सेनेचे सर्व पदाधिकारी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत असतानाही केवळ एकनाथ शिंदे यांचे समर्थक म्हणून माझे जिल्हाप्रमुख पद काढल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सामूहिक राजीनामे पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याबाबत पदाधिकाऱ्यांना समजवण्याचा मी प्रयत्न केला, परंतु सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. युवा सेनेचे सर्व निष्ठावंत पदाधिकारी, युवासैनिक आम्ही कायम शिवसेनेच्या सोबतच राहून हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहू.

- मनीष काळजे, माजी युवा सेना जिल्हाप्रमुख