महेश काळे यांच्या सादरीकरणावर सोलापूरकर म्हणाले...."शब्दांच्या पलीकडले"

हुतात्मा स्मृती मंदिर झाले हाउसफुल्ल !

महेश काळे यांच्या सादरीकरणावर सोलापूरकर म्हणाले...."शब्दांच्या पलीकडले"

सोलापूर : प्रतिनिधी
'शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले', 'देवाघरचे ज्ञात कुणाला', 'हे सुरांनो चंद्र व्हा..' अशा एकाहून एक अवीट गीतांनी मैफिल रंगली. निमित्त होते लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांच्या स्वर संध्या या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे ! ज्या गायनाचे कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत असा 'शब्दांच्या पलीकडला' अनुभव सोलापूरकरांना शनिवारी सायंकाळी या कार्यक्रमातून आला.

प्रारंभी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर हस्ते आणि सुदत्त पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात गायक महेश काळे यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्यसंगीत, भक्तीसंगीत, सादर करून सोलापूरकर रसिकांची वाहवा मिळवली. राग पुरिया कल्याणमध्ये विलंबित एकतालात बंदिश सादर करून त्यांनी आपल्या गायनाचा प्रारंभ केला. यानंतर 'बहुत दिन भी तेरे बीते' ही बंदिश अद्धा त्रितालात सादर केली. द्रुत तीन तालात सादर केलेल्या 'मन हरवा आयो रे' ला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

'देवा घरचे ज्ञात कुणाला' हे नाट्यगीत आपल्या खास शैलीत सादर करून महेश काळे यांनी सोलापूरकरांच्या प्रचंड टाळ्या मिळवल्या. आपले गुरु पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या 'माझे जीवन गाणे' हे प्रसिद्ध गीत महेश काळे यांनी सादर केल्यानंतर रसिकांनी ठेका धरला. कट्यार काळजात घुसली चित्रपटातील 'सुर निरागस हो' या गाण्याच्या सादरीकरणालाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

'शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले' हे गीत सादर करताना त्यांनी त्याच ठेक्यात 'रोजा जानेमन', तसेच 'तेरा सहारा मिल गया है जिंदगी' ही गाणी सादर करून आपल्या अनोख्या आणि कौतुकास्पद गायन शैलीचा परिचय सोलापूरकरांना करून दिला.

रसिकांच्या आग्रहास्तव 'हे सुरांनो चंद्र व्हा' हे गीत सादर करताच रसिकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली. यानंतर 'मन लोभले मन मोहले', 'घेई छंद मकरंद', 'कैवल्याच्या चांदण्यांना भुकेला चकोर' आदी गीतेदेखील महेश काळे यांनी अतिशय सुरेल आवाजात सादर केली.

'आता मी अनन्य येथे अधिकारी' या जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाला महेश काळे यांनी नुकतीच चाल लावली आहे. हे गीत प्रथमच महाराष्ट्रात त्यांनी सोलापुरात सादर केले.

याप्रसंगी मीडीया पार्टनर असलेल्या संवाद तरुण भारतचे संपादक विजय देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी सोलापूरकर श्रोत्यांनी तुडुंब गर्दी केली होती.
-----------
काळे गुरुजींचा भरला क्लास.....!
या कार्यक्रमात गायक महेश काळे यांनी सभागृहात उपस्थित रसिकांकडून काही ओळी गाऊनही घेतल्या. संगीताची प्राथमिक माहिती देत महेश काळे यांनी 'शब्दा वाचून कळले सारे' या आपल्या गीत सादरीकरणात रसिकांनाही सहभागी करून घेतले. रसिकही अत्यंत तल्लीनतेने गीत म्हणण्यात गुंग झाले. यातून काही वेळासाठीच का होईना पण महेश काळे यांच्या गायनाच्या क्लासमध्ये बसल्याचा अनुभव सोलापूरकर रसिकांना आला.