सुश्राव्य कीर्तन अन् सुरेल संगीताने सोलापूरकर मंत्रमुग्ध

सेवासदनच्या शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभास प्रारंभ

सुश्राव्य कीर्तन अन् सुरेल संगीताने सोलापूरकर मंत्रमुग्ध

सोलापूर : प्रतिनिधी

सुश्राव्य कीर्तन आणि सुरेल संगीताने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले. सेवासदन संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या तीन दिवसीय सांगता समारंभास गुरुवारपासून हुतात्मा स्मृती मंदिरात प्रारंभ झाला.

प्रारंभी सकाळी सांगता समारंभाचे उद्घाटन पुणे सेवासदन संस्थेच्या कार्याध्यक्षा अश्विनी गानू, सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा प्रा. वीणा पतकी, संचालक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, डॉ. राजीव प्रधान, राजेंद्र गांधी, विजया निसर यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिवा प्रा. वीणा पतकी यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी 'स्त्री शिक्षण' या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. आफळे बुवा म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी राष्ट्रमाता जिजामातांनी छत्रपति श्री शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली. त्याप्रमाणे आजच्या स्त्रीनेही शिक्षण घेऊन आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना केला पाहिजे. स्त्रियांसाठी समाजात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा उपयोग करून स्वतःचा, कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास स्त्रीशक्तीने करावा. रमाबाई रानडे यांनी सेवासदनची स्थापना केली. या माध्यमातून हजारो गुणवंत विद्यार्थिनी घडवल्या. हे कार्य गौरवस्पद आहे, असेही ह.भ.प. चारुदत्त बुवा आफळे यांनी सांगितले.

दुसऱ्या सत्रात सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात सुरेल सांगीतिक मैफल रंगली. यात विलास कुलकर्णी, प्राजक्ता देशपांडे आणि मेघांबरी साळुंखे यांनी उत्तमोत्तम गीते सादर करत रसिकांची मने जिंकली. विलास कुलकर्णी यांनी गायलेल्या 'हृदयाच्या तालावर नाचे गणेशु' या भक्ती गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विलास कुलकर्णी यांनी 'धाव पाव स्वामी समर्था', 'माझे माहेर पंढरी', 'विठू माऊली तू', प्राजक्ता देशपांडे यांनी 'गगन सदन तेजोमय', मेघांबरी साळुंखे यांनी 'चाफा बोलेना' ही गीते सादर करत रसिकांच्या टाळ्या मिळवल्या. मेघांबरी साळुंखे आणि विलास कुलकर्णी यांनी सादर केलेल्या 'धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना' तर विलास कुलकर्णी यांनी सादर केलेल्या 'हे सुरांनो चंद्र व्हा' या गीताला उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत वाहवा केली. निवेदन माधव देशपांडे यांनी केले. गायकांना तबल्यावर पं. आनंद बदामीकर, श्रीराम कुलकर्णी तर पखवाजवर देवेंद्र आयाचित, व्हायोलिनवर जयंत जोशी, ऑक्टोपॅडवर जब्बार मुर्शद
यांनी साथ केली.
-----------

उद्या परिसंवाद

उद्या गुरुवारी (दि.२० ) 'स्त्रियांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान' या विषयावर सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिसंवाद होणार आहे. यात आ. प्रणिती शिंदे, डॉ. सुहासिनी शहा, मृणालिनी जोशी - कानिटकर, नेहा बेलसरे वक्त्या म्हणून सहभागी होणार आहेत.