सोलापूर विमानसेवेबाबत आनंदाची बातमी
राज्य सरकारचा मोठा निर्णय : प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्याच्या हालचालींना वेग
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर- पुणे ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या निर्णयामुळे सोलापूरमध्ये प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सोलापूर विमानतळ हे नवीन असून, राष्ट्रीय विमान वाहतूक धोरणांतर्गत या ठिकाणी बिडींगची प्रक्रिया सुरु आहे. ही योजना प्रत्यक्ष सुरु होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने, पुढील एक वर्षासाठी सोलापूर विमानतळावरून हवाई सेवेसाठी शंभर टक्के व्हायबिलिटी गॅप फंडिंग करण्याचा निर्णय झाला.
--------
व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे काय ?
विमानाच्या एकूण आसन क्षमतेपैकी ठराविक टक्के आसने रिकामी राहिली तर आसन क्षमता पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या उर्वरित आसनांसाठीचे पैसे देण्याच्या प्रक्रियेला व्हायबिलिटी गॅप फंडिंग म्हणतात. त्यामुळे विमानसेवा सुरू झाल्यानंतर पुढील वर्षभर जरी काही आसने रिकामी राहिली तरी राज्य सरकार सोलापूर विमानतळावरून हवाई सेवेसाठी शंभर टक्के व्हायबिलिटी गॅप फंडिंग करणार आहे. परिणामी, प्रवासी नाहीत म्हणून सोलापुरातून विमानसेवा बंद होण्याचा धोका संपूर्ण वर्षभरासाठी टळला आहे.