गरजू ३०० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करीत जपली सामाजिक बांधिलकी

संतोष केंगनाळकर यांचा पुढाकार

गरजू ३०० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करीत जपली सामाजिक बांधिलकी

सोलापूर : प्रतिनिधी

बहुतांश कामगार वसाहत असलेल्या स्वागत नगर परिसरातील गरजू ३०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करीत संतोष केंगनाळकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली. त्यांचे वडील संगपण्णा केंगनाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला.

रविवारी स्वागत नगर येथील केंगनाळकर शिक्षण संकुलात, कै.संगप्णा आण्णा केंगनाळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन पू. कुमार स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी संगपण्णा केंगनाळकर यांना अभिवादन केले. गणवेश वाटप कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एक्टीव्हेट जीमचे संचालक शशिकांत अक्कलवाडे, भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष महेश देवकर, आनंद बुक्कानुवरे, काशिनाथ भतगुणकी, शिवानंद चलवादी, दीपक जमादार, सिद्धारुढ हिटन्नळी उपस्थित होते. तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संतोष केंगनाळकर, अशोक केंगनाळकर, धर्मराज केंगनाळकर उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष केंगनाळकर म्हणाले, गरजू विद्यार्थ्यांना नियमितपणे गणवेशात शाळेत जाता यावे, याकरिता शाळेचे संस्थापक संगपण्णा केंगनाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गणवेश वाटप केले आहे. स्वागत नगर परिसरातील कामगारांच्या पाल्यांना शिक्षण मिळावे, याकरिता संगपण्णा केंगनाळकर यांनी या परिसरात शाळा सुरू केली. परिणामी, केंगनाळकर प्रशालेतून आजवर हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन स्वावलंबी झाले आहेत. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असणाऱ्या येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावी आयुष्यात डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, उच्चपदस्थ अधिकारी, यशस्वी व्यवसायिक बनून जीवनात प्रगती करणे हिच शाळेचे संस्थापक संगपण्णा केंगनाळकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यानंद स्वामी यांनी केले. रेवणसिध्द शेड्याळ यांनी सूत्रसंचालन तर प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
---------------
पालकांनी मानले आभार
गरजू असलेल्या ३०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करून त्यांना मदत केल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थेचे अध्यक्ष संतोष केंगनाळकर यांचे यावेळी आभार मानले.