सोलापूर जनता बँकेची सभासदांना भेट !

मिळणार लाभांश : सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण

सोलापूर जनता बँकेची सभासदांना भेट !

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जनता सहकारी बँकेकडून आर्थिक वर्ष २०२२ -२३ साठी ७ टक्के लाभांश जाहीर केला आहे. २५ फेब्रुवारी पर्यंत सभासदांच्या खात्यात हा लाभांश जमा करण्यात येईल, अशी माहिती सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले, कोविड आणि त्यानंतरच्या काळात बहुतांश सहकारी बँकांची आर्थिक स्थिती काही प्रमाणात नाजूक बनली होती. मात्र त्याही परिस्थितीत सोलापूर जनता सहकारी बँकेने गत आर्थिक वर्षात २६.१० कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून साहजिकच सहकारी बँकांवर आर्थिक समतोलासाठी काही निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी बँकेला लाभांश वाटप करणे शक्य होत नव्हते. सोलापूर जनता सहकारी बँकेस आर्थिक वर्ष २०२२ - २३ मध्ये २६ कोटी १० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांना यंदा ७ टक्के प्रमाणे लाभांश देण्यासाठी रिझर्व बँकेकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावास अनुमती मिळाली असून ७ टक्के लाभांश सभासदांना वाटप करण्यात येणार आहे, असे बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले.

सोलापूर जनता सहकारी बँकेकडे १८११ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ९७४ कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून एकूण व्यवसाय २७८५ कोटी रुपयांचा झाला आहे. बँकेचे भाग भांडवल ७०.८९ कोटी रुपये आहे. तर बँकेची निव्वळ संपत्ती १३७ कोटी रुपये आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) १२ टक्के असणे अपेक्षित आहे. मात्र सोलापूर जनता सहकारी बँकेने यातदेखील आघाडी घेतली असून बँकेची भांडवल पर्याप्तता १६.९७ टक्के आहे. त्यामुळे बँकेच्या भांडवलाची स्थिती उत्तम असल्याचेही अध्यक्ष श्री. पेंडसे म्हणाले.

मागील आर्थिक वर्षात सोलापूर जनता सहकारी बँकेने ४३.५७ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा मिळवला आहे. तर बँकेच्या नेट एनपीएमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट होऊन नेट एनपीए ४.२८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये चांगली वसुली व एनपीए व्यवस्थापनामुळे आजअखेर नेट एनपीएचे प्रमाण २.४३ पर्यंत खाली आले आहे.

सोलापूर जनता सहकारी बँकेने दिलेले कर्जाचे व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. नवीन वाहन खरेदी व गृह कर्जाचे व्याजदर कमी झाल्याने ग्राहकांना बँकेकडून दिलासा मिळाला आहे, असेही श्री. पेंडसे यांनी सांगितले.

आरबीआयने पतधोरणामध्ये पॉलिसी दरात बदल केल्याने त्याचा परिणाम ठेवी आणि कर्जे यांच्या व्याजदरात झाला आहे. अशा परिस्थितीतही बँकेने व्यवसाय वाढीसाठी विविध प्रकारच्या कर्ज योजना जाहीर केल्या आणि त्यातून समाजातील सर्व घटकांना फायदा व्हावा असा विचार केला. अमृत उत्सव कर्ज योजनेअंतर्गत कर्जावरील व्याजदर कमी करून खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न बँकेने केला असल्याचेही अध्यक्ष श्री. पेंडसे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲड. मिलिंद कुलकर्णी, संचालक प्राचार्य गजानन धरणे, मुकुंद कुलकर्णी, वरदराज बंग, विनोद कुचेरिया, चंद्रिका चौहान, रविंद्र साळे, आनंद कुलकर्णी, सी. ए. गिरीश बोरगावकर, राजेश पवार, पुरुषोत्तम उडता, दत्तात्रय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य डॉ. अजितकुमार देशपांडे, उपसरव्यवस्थापक अंजली कुलकर्णी, सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, रामदास सिद्धूल, मुख्याधिकारी आनंद ताशी, मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे, सुहास कमलापुरकर उपस्थित होते.

------------------

जनता बँकेच्या कामकाजाचे आरबीआयने केले कौतुक

सोलापूर जनता सहकारी बँकेने गेल्या दोन वर्षात कर्ज वसुली मोठ्या प्रमाणावर केली आहे. परिणामी बँकेचा एनपीए कमी झाला आहे. सोलापूर जनता सहकारी बँकेच्या या कामकाजाचे रिझर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कौतुक केले आहे. ग्राहकांनी अधिकाधिक ठेवी सोलापूर जनता सहकारी बँकेत ठेवून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सुनिल पेंडसे यांनी केले आहे.