लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन
सावित्रीबाई साठे यांची प्रमुख उपस्थिती : लोकशाहिरांच्या सूनेचे जल्लोषात स्वागत
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये बांधण्यात येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते रविवारी थाटात करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने होत असलेल्या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यासाठी साठे यांची सून आल्याने सोलपूरकरांनी त्यांचे रांगोळ्यांच्या पायघड्या घालून, ढोल - ताशांच्या निनादात गुलाबपुष्प उधळून स्वागत केले.
पाथरूट चौकाजवळील अण्णाभाऊ साठे नगर, मातंग वस्ती येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख होते. तर महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटोळे, नगरसेवक रवि कैय्यावाले, नगरसेवक राजकुमार पाटील, विजय अडसूळे, संजय साठे, यतिराज अडसूळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सावित्रीबाई साठे यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी श्रीमती साठे म्हणाल्या, समाजातील प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे. समाजातील शिक्षितांचे प्रमाण वाढण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजाला प्रगतीची द्वारे खुली व्हावीत यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत.
यावेळी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माजीमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, सुरेश पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास मातंग समाजाचे पंच भोलेनाथ साबळे, संभाजी डुकरे, अनिल साठे, दत्ता अडसूळे, बाळू गायकवाड, लालू साठे, सुधाकर अडसूळे, दत्ता कांबळे, विजय अडसूळे, संजय साठे, राम बोराडे, सतिश गायकवाड, राज क्षीरसागर आदी उपस्थित होते.
नगरसेवक सुनील कामाठी यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन तर लालू साठे यांनी आभार प्रदर्शन केले.
या असतील सुविधा
या दोन मजली सांस्कृतिक भवनामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे शिल्प साकारण्यात येणार आहे. तसेच प्रशस्त हॉल, कार्यालय, भव्य व्यासपीठ आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.