इन्फल्युएंझा आजाराबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याला काय सांगितले ?

वाचा

इन्फल्युएंझा आजाराबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याला काय सांगितले ?

सोलापूर : प्रतिनिधी

इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावेत. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसात फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. सर्दी, खोकला अंगावर काढु नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लुवरील औषध सुरु करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारा सोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी. खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हात रुमाल वापरावा. आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सहआयुक्त संजय कुमार ,वैद्यकीय शिक्षण सचिव अश्विनी जोशी, सचिव डॉ. नवीन सोना, आरोग्य आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्मचा-यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी आणि आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमुन उपचाराचे काम सुरु ठेवावे. 

इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझाचे टाईप A B आणि C,  असे प्रकार आहेत. इन्फल्युएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला,घशात खवखव , धाप लागणे , न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात. 

यासाठी कोविड 19 / इन्फल्युएंझा बाबतीत नियमित रुग्ण सर्वेक्षण, सहवासितांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.