भूगोलाच्या सहाय्याने शिवछत्रपतींनी निर्माण केला इतिहास
शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे : शिवस्मारक मंडळ व लोकमंगल फाउंडेशनतर्फे दुर्गबांधणी स्पर्धेचे उद्घाटन
सोलापूर : प्रतिनिधी
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात गडकोट नसते तर त्यांना स्वराज्य निर्मितीत मोठे अडथळे आले असते. छत्रपती श्री शिवरायांनी भूगोलाच्या सहाय्याने दैदीप्यमान इतिहास निर्माण केला, असे प्रतिपादन शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी केले.
शिवस्मारक मंडळ व लोकमंगल फाउंडेशनतर्फे आयोजित दुर्गबांधणी स्पर्धेचे उद्घाटन रविवारी डॉ. शेटे यांच्या हस्ते शिवस्मारकच्या मैदानावर झाले.
यावेळी व्यासपीठावर छत्रपति श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, लोकमंगल फाऊंडेशनचे संचालक मारुती तोडकर उपस्थित होते.
डॉ. शेटे म्हणाले, छत्रपती श्री शिवरायांनी केलेले दुर्ग बांधणीचे काम हे राष्ट्रनिर्माणाचे काम होते. त्यामुळे प्रत्येकाने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या गडकोट दुर्गांची भ्रमंती निश्चित करावी. पुस्तकातून, चित्रातून गडकोट जितके कळतील त्याहून कित्येक पट अधिक प्रत्यक्ष गडकोटांना भेटी दिल्यावर ती कळतील. हल्ली ट्रेडमिल टेस्ट द्वारे हृदयाची क्षमता तपासणीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र दुर्गभ्रमंती ही सर्वात मोठी ट्रेडमिल टेस्ट आहे. गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात गड चढताना आपल्या हृदयाची क्षमता आपल्याला आपोआपच कळते, असेही डॉ. शेटे यावेळी म्हणाले. फराळ खाण्याच्या, फटाके उडविण्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्कार रुजविण्याचे काम शिवस्मारक आणि लोकमंगल फाऊंडेशनतर्फे होत आहे. विद्यार्थ्यांचे जीव ओतून दुर्ग बांधणीचे केलेले काम कौतुकास्पद आहे, असे डॉ. शेटे यांनी याप्रसंगी सांगितले.
दुर्गबांधणी स्पर्धेत ज्ञानप्रबोधिनी बाल विकास मंदिर प्रशाला, के. एल. ई. स्कूल, कै. वि. मो. मेहता माध्यमिक शाळा, हरिभाई देवकरण प्रशाला, इंदिरा प्रशाला, संगमेश्वर महाविद्यालय, जोडलिंग मारुती शाखा, शिव छत्रपति ग्रुप या शाळा, महाविद्यालय तसेच संस्थांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांनी श्री राजगड, श्री प्रतापगड, श्री लोहगड, श्री सिंधुदुर्ग, श्री जंजिरा, श्री मल्हारगड, श्री रामशेज, श्री प्रसन्नगड, श्री कोरीगड, श्री शिवनेरी असे अतिशय सुरेख दुर्ग बांधले आहेत. शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता शिवस्मारक सभागृहात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
डॉ. रवि जाधव आणि नितिन अणवेकर यांनी परिक्षण केले.
छत्रपति श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक केले. शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने यांनी सूत्रसंचालन तर लोकमंगल फाऊंडेशनचे संचालक मारुती तोडकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर, अनिल कवडे, शैलेश कुलकर्णी, महादेव पवार, देविदास मानवी, कोंडीबा पोळ, शंकर सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
-----------
सोलापूरातील विद्यार्थ्यांना आवाहन
सोलापुरातील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बांधलेले हे गडकोट पाहण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत खुले आहे. विद्यार्थी, पालक शिक्षक तसेच नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन शिवस्मारकतर्फे करण्यात आले आहे.