हसल्याने रहाल कोरोनाच्या नकारात्मकतेपासून दूर : प्रा. दीपक देशपांडे

'देवाक काळजी रे !' संवाद मालिका

हसल्याने रहाल कोरोनाच्या नकारात्मकतेपासून दूर : प्रा. दीपक देशपांडे

जगात अशी कोणतीही समस्या नाही जिचे समाधान नाही. सध्याच्या कोरोनाच्या समस्येवरही लवकरच समाधान सापडेल. त्यामुळे तणावग्रस्त न होता अधिकाधिक हसत रहा, त्यामुळे कोरोनाच्या नकारात्मकतेपासून निश्चित दूर रहाल, असा सल्ला हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' शी बोलताना दिला.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या बातम्या आपल्या कानांवर अक्षरशः आदळत आहेत. बाहेरील परिस्थिती चिंताजनक आहे. म्हणून आपण याचा परिणाम आपल्यावर होऊ देऊन नकारात्मक का रहावे ?

कोरोना रुग्णांना बाहेरील औषधे देत आहेत. पण रुग्ण, नातेवाईक यांनी आतूनही मनाने कणखर राहणे अत्यंत आवश्यक आहे. इच्छाशक्ती मजबूत असेल तर औषधांचाही परिणाम अधिक चांगला होतो. याकाळात ज्यांची इच्छाशक्ती चांगली ते यातून सुटण्यास नक्की मदत होणार आहे.

डॉक्टर जेंव्हा रुग्णांवर उपचार करतात किंवा शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला शल्यचिकित्सागृहात घेऊन जातात तेंव्हा त्या रुग्णाशी अत्यंत विनोदी संभाषण करतात. कारण त्या रुग्णाची मानसिकता सकारात्मक असेल तर तो त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देतो, असेही प्रा. देशपांडे म्हणाले.

हा काळ जरी नकारात्मकतेचा असला तरी आपण यातून मार्ग काढून आनंदी राहण्याचा, हसत राहण्याचा यशस्वी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी दर्जेदार विनोदी साहित्य वाचावे. पु. ल. देशपांडे, द. मा. मिराजदार, शंकर पाटील, मुकुंद टांकसाळ आदी लेखकांचे विनोदी साहित्य जरूर वाचावे. हल्ली स्टोरीटेलिंग एप वर शेकडो पुस्तके ऐकता येतात. वर्षभर आपल्याला वाचनाला वेळ देता येत नसेल तर कोरोनाचा हा काळ संकट न समजता संधी समजून वाचन केले पाहिजे.

नाईलाजाने बाहेर जावे लागलेच तर स्वच्छतेचे नियम पाळणे, सामाजिक अंतर पाळणे आदी नियमांचे पालन आणि खबरदारी तर घेतली पाहिजेच. परंतु बाहेरील परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होऊ न देता आनंदी रहा, हसत रहा आणि सुखरूप रहा असे हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे म्हणाले.