मोठी ब्रेकिंग ! आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत सोलापूरात म्हणाले.....
प्रियदर्शन साठे आणि कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
सोलापूर : प्रतिनिधी
पक्षात इन्कमिंग म्हणजे काय असते हे १७ सप्टेंबर नंतर सोलापूरकरांना दिसेल. १७ सप्टेंबरनंतर अनेकजण शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.
प्रियदर्शन साठे मित्रपरिवार आणि सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे हेरिटेज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रवेश कार्यक्रमात सोमवारी रात्री ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, संयोजक प्रियदर्शन साठे, मनोज साठे, आशिष परदेशी, दीपक पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक महादेव बिद्री, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विशाल कल्याणी, आशिष परदेशी, प्रविण बिराजदार, मोहसीन जमादार आदी विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना भगवे उपरणे परिधान करून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.
आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळात सोलापूर महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत इनकमिंग होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. २०२४ पर्यंत राज्य विकासात आघाडीवर नेण्याचा संकल्प शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने केलेला आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
--------------
शिवसेना आमचीच !
शिंदे गट वगैरे काहीही अस्तित्वात नाही. खरी शिवसेना आमचीच आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली हिंदुत्वाची विचारधारा पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
------------------
कोणाचे होणार इनकमिंग ?
१७ सप्टेंबर नंतर अनेक जणांचे इनकमिंग शिवसेनेत होणार असल्याचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगताच शहरात या इनकमिंगविषयी चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या बड्या नेत्यांचे इनकमिंग १७ सप्टेंबर नंतर होणार ? याकडे आता सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.