उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काय म्हणाले देवेंद्र कोठे ?

भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काय म्हणाले देवेंद्र कोठे ?

सोलापूर : प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे शहर मध्य मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांनी सोमवारी वसुबारसचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहर कार्यालयात जल्लोष केला. 

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या शहर मध्य मतदारसंघात भारतीय जनता पार्टीतर्फे देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर देवेंद्र कोठे अर्ज कधी भरणार याबाबत उत्सुकता होती. अखेर सोमवारी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, रोहिणी तडवळकर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, दत्तात्रय गणपा, विनायक कोंड्याल यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. 

यावेळी देवेंद्र कोठे म्हणाले, सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे. सर्वसामान्य जनतेचा विकास होण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. सर्वांशी चर्चा करून समन्वय साधून आगामी वाटचाल करणार असल्याचेही भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले. 

भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, शहर मध्य मतदार संघातून भाजपा आणि महायुतीचा आमदार विधानसभेत पाठवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा जोरदार प्रचार करून भाजपाची ध्येयधोरणे, सरकारने महाराष्ट्रात केलेला विकास जनतेसमोर मांडावा. यावेळी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या हस्ते उमेदवार देवेंद्र कोठे यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला.

अर्ज भरण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहर भाजप कार्यालयात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. याप्रसंगी शहर मध्य विधानसभा संयोजक दत्तात्रय गणपा, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अंबादास बिंगी, शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा, शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, विजया वड्डेपल्ली, चिटणीस नागेश सरगम, भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, माजी नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले, राजश्री बिरू, प्रतिभा मुदगल, दत्तात्रय पोसा, श्रीनिवास जोगी, मेघनाथ येमूल, राजकुमार हंचाटे, सुनील पाताळे, सुनील टोणपे आदी उपस्थित होते.