भटक्या विमुक्त समाजासाठी खुशखबर !
वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
भटक्या विमुक्त समाजासाठीच्या सेटलमेंट परिसरातील घरकुल प्रकल्पाचे भूमिपूजन ३१ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आणि विद्यार्थिनींना मोफत शिक्षण जाहीर केल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्यातर्फे शनिवारी सेटलमेंट येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मोहन डांगरे, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष भारत जाधव, आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, डॉ. अश्विन वळसंगकर, डॉ. शोनाली वळसंगकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ३१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या घरकुल प्रकल्पाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. सेटलमेंट आणि परिसरातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांचे उतारे मिळणे, त्यांना त्यांच्या हक्काची घरकुले मिळणे यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र सरकार महिलांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये, मुलींचे मोफत उच्च शिक्षण, महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर, पिंक रिक्षा अशा अनेक योजना सरकार राबवत आहे तसेच आगामी काळातही योजना राबविण्यात येणार आहेत.
याप्रसंगी उद्योगपती दत्ता सुरवसे, राज्याचे माजी अव्वर सचिव लालासाहेब जाधव, उद्योगपती प्रमोद साठे, उद्योगपती काशिनाथ जाधव, मागास समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष चव्हाण, समाजसेविका अरुणा वर्मा, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. दुर्गप्पा पवार, पुणे येथील महिला व बालकल्याण आयुक्त संजय माने, पत्रकार रामू गायकवाड, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स खेळाडू वंदना गायकवाड, शिक्षक राहुल जाधव, शिक्षक अंकुश जाधव यांना त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच मंत्रालयातील सहाय्यक कक्षा अधिकारी अबोली गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आरती जाधव, आय. ए. एस. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वाती राठोड यांना त्याचबरोबर डॉ. सुजाता जाधव (छत्रपती संभाजी नगर), प्रा. शारदा जाधव (पुणे), शिक्षिका प्रभा जाधव (पुणे), समाजसेविका शैलजा जाधव (सांगली), समाजसेविका संगीता माने (सासवड), शिक्षिका निर्मला जाधव (परभणी), समाजसेविका माया कुंचिकोरवी (मुंबई), समाजसेविका सुलोचना माने (सांगली) यांना सन्मानपत्राने गौरविण्यात आले.
याप्रसंगी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, उपाध्यक्ष सचिन हिरेमठ, सचिव योगेश डांगरे, खजिनदार राहुल डांगरे, आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव, सृष्टी डांगरे आदी उपस्थित होते. आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
-------
भटक्या विमुक्त समाजबांधवांनी काढली पालकमंत्र्यांची गाडीतून मिरवणूक
भटक्या विमुक्त समाज बांधवांच्या घरकुलासाठी अखंड प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सजवलेल्या गाडीतून शनिवारी मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात सेटलमेंट परिसरातून उत्साहात ही मिरवणूक निघाली. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक विशेषत: महिला उपस्थित होत्या.