भारताच्या समस्येची कारणे देशाच्या फाळणीत दडलेली
सुनील देवधर : शिवस्मारकतर्फे अखंड भारत संकल्प दिन उत्साहात
सोलापूर : प्रतिनिधी
भारताच्या सद्यस्थितीतील समस्येची कारणे देशाच्या फाळणीत दडलेली आहेत. सर्व संकटांवर मात करून हिंदुस्थान पुन्हा अखंड होईल असा आशावाद माय होम इंडिया सामाजिक संस्थेचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केला. अखंड भारत संकल्प दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ (शिवस्मारक) तर्फे गुरूवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुनील इंगळे, शहर संघचालक राजेंद्र काटवे, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बालाजी यल्ला यांनी 'ओ विजय के पर्व पौरूष' हे पद्य सादर केले.
श्री. देवधर म्हणाले, भारतातील जो भूभाग हिंदू अल्पसंख्य होतो तो भाग फाळणीच्या दिशेने वाटचाल करू लागतो हा आजवरचा इतिहास आहे. हिंदूंना आत्मविस्मृत करण्यासाठी कम्युनिस्ट इतिहासकारांनी चुकीचा इतिहास पुढे आणला. धार्मिक लढाईला राजकीय लढाई सांगून हिंदूंची दिशाभूल करण्यात आली. भारताचा राष्ट्रध्वज भगवा असला पाहिजे असा राष्ट्रध्वज समितीचा असूनही तो निर्णय बदलण्यात आला. हिंदूंना सर्वधर्मसभावाचे इंजेक्शन सर्व स्तरातून आजही दिले जात आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्यासारख्या राजांमुळे हिंदुस्थान सुरक्षित राहिला. मातृभूमी म्हणजे केव्हाही कापायला तो वाढदिवसाचा केक नव्हे. परंतु दुर्दैवाने भारतात फाळणीच्या रूपाने हे घडले. हिंदूंनीच हिंदूंच्या समस्या सोडवण्याचा निर्धार आणि कृती केली तर भारत अखंड व्हायला वेळ लागणार नाही, असेही वक्ते सुनील देवधर यांनी सांगितले.
शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन केले. शिवस्मारकचे संचालक प्रसाद जिरांकलगीकर यांनी सूत्रसंचालन केले. योगीनाथ बिराजदार यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम् ने कार्यक्रमाचा शेवट झाला. वक्ते सुनील देवधर यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर तुडुंब भरले होते. यावेळी सोलापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.