ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी

पोलीस आयुक्त एम. राज कुमार : १०० जन्मठेपांबद्दल १०० सामाजिक उपक्रमाचा रक्तदानाने शुभारंभ

ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी

सोलापूर : प्रतिनिधी 

जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना १०० गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देणारे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे कार्य विधी क्षेत्रासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी काढले. 

जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी १०० गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिल्याबद्दल १०० सामाजिक उपक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्याचा शुभारंभ बुधवारी डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराने झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अमित आळंगे, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष रमेश विश्वरूपे, सचिव सत्यनारायण गुंडला उपस्थित होते. 

भारतमातेच्या प्रतिमापूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस आयुक्त एम. राज कुमार म्हणाले, १०० गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून देणे हे कौतुकास्पद कार्य आहे. १०० जणांना जन्मठेपेची शिक्षा लागली याचा आनंद नसून १०० पीडित कुटुंबांना न्याय मिळाला याचा आनंद आहे. ॲड. राजपूत यांनी पोलीस दलाच्या मेहनतीलाही फळ मिळवून दिले आहे. विधी क्षेत्रात येणाऱ्या नवयुवकांनी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचा आदर्श घ्यावा.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, एखाद्या गुन्ह्यात वकिलाने गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणे हे अतिशय महत्त्वाचे काम असते. त्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागते. जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी मेहनत करून  पीडितांची बाजू मांडली आणि पीडितांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कामगिरीमुळे पोलीस दलाच्याही कामगिरीत सुधारणा दिसली.

जेष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे म्हणाले, जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करणे अतिशय अवघड काम आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ॲड. राजपूत यांनी काम केले. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने ते सातत्याने कार्यरत असतात.

प्रशांत बडवे यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन तर ॲड. प्रियंका पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास अशोक संकलेचा, मदन मोरे, किरण सुतार, प्रशांत बडवे, व्यंकटेश कैंची, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे संचालक मिलिंद फडके, नितीन कवठेकर, व्यवस्थापक रंगनाथ जोशी, ॲड. अजिंक्य जाधव, ॲड. अशोक श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

---------
१२१ जणांनी केले रक्तदान

जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांच्या सन्मानार्थ १२१ जणांनी रक्तदान केले. १०० गुन्हेगारांना जन्मठेप मिळवून दिल्याबद्दल जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे रक्तदान करुन अभिनंदन करण्यात आले.