आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाला केले 'हे' आवाहन

काय म्हणाले आमदार पडळकर ? : पहा व्हिडिओ !

आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाला केले 'हे' आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी

ओबीसी समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे शनिवारी इंदापूर येथे गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकाराबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्हिडिओ प्रसारित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या व्हिडिओतून श्री. पडळकर यांनी ओबीसी समाजाला शांततेचे आवाहन केले आहे.

आमदार पडळकर म्हणाले, ओबीसी समाज अत्यंत संयमाने, शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामध्ये स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडतोय. 

काल इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत या सुरु असलेल्या आंदोलनास मी जात असताना नौटंकीचा हा प्रकार घडला. आणि नंतर या भेकडांनी परत नौटंकीबाजी करत मिडीयात मुलाखती दिल्या. आणि ते म्हणतात सदर घटना माझ्याच कार्यकर्त्यांनी केली. खरोखर मला यांची कीव वाटते. 

मुळात आम्ही नेहमीच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. पण मराठा आरक्षणाच्या प्रामाणिक लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की या समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे, असेही श्री. पडळकर म्हणाले.

काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी माझ्या ओबीसी बांधवांना आवाहन करतो की आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. कारण आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर आरक्षण दिले आहे.

त्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर यावर काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.