अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री

आमदार देशमुख यांची खरमरीत टीका

अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री

सोलापूर : प्रतिनिधी
महाआघाडी सरकारमधील अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री आहेत असे टीकास्त्र माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोडले. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर आमदार देशमुख बोलत होते.

आमदार देशमुख म्हणाले, 'आज संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पुणे विभागामध्ये सर्वात जास्त नुकसान सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे झाले आहे. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ५८ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यातील ६२३ गावे जलमय झाली आहेत. या गावातील ८ हजार ६०८ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

एकूण ३२ हजार ५२१ नागरिकांना जिल्हा परिषद शाळा, साखर कारखाना तसेच धार्मिक मठांमध्ये ठेवण्यात आले आहे. या लोकांना शासनाकडून म्हणावी तशी मदत मिळत नसल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे, असेही आमदार श्री.देशमुख म्हणाले.

या अतिवृष्टीत सोळा जण मृत्युमुखी पडले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून शेतकऱ्यांना आशा होती. अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री आज काही तरी मोठी घोषणा करतील आणि आपल्या पदरी काहीतरी भरघोस मदत मिळेल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र कोणतीही घोषणा त्यांनी केली नाही. या सरकारमधील सर्व मंत्र्यांना महाराष्ट्रातील जनतेचे देणेघेणे नाही. तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर दौऱ्यावेळी मोठी आर्थिक पॅकेजची घोषणा करणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. यावरूनच या तिघाडी सरकारमधील अजित पवार हे नामधारी उपमुख्यमंत्री असल्याचे सिद्ध होते, असे आमदार विजयकुमार देशमुख यांनी म्हटले.