अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा

टंकलेखन लघुलेखन आणि संगणक संस्थेची वर्ग सुरू करण्याची मागणी

अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील संगणक टायपिंग व लघूलेखन संस्था सुरू कराव्यात अन्यथा आम्ही आत्मदहन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य टंकलेखन - लघु लेखन, संगणक टायपिंग शासनमान्य संस्थांची संघटना, मुंबईचे जिल्हा प्रतिनिधी पी.आर. कुलकर्णी यांनी दिला आहे.
 
याबाबत श्री. कुलकर्णी म्हणाले, पुणे विभागात जोपर्यंत या संस्थांचे वर्ग सुरू होत नाहीत, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात संस्थांचे वर्ग सुरू करता येणार नाहीत अशी भूमिका सोलापूर जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला घेतली होती. मात्र पुणे विभागात वर्ग सुरू होऊन देखील अद्याप सोलापूर जिल्ह्यात टंकलेखन-लघुलेखन, संगणक टायपिंग संस्थांचे वर्ग सुरू करण्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. हे अन्यायकारक आहे.

राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांत तेथील जिल्हा प्रशासनाने हे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात तसे आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज,  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार रोहित पवार, आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष राजा सरवदे, माजीमंत्री डी. पी. सावंत या सर्वांनी वर्ग सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना विनंती केली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताच निर्णय न झाल्यामुळे संस्थाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात टंकलेखन-लघुलेखन, संगणक टायपिंग संस्थांचे वर्ग सुरू झाले नाहीत तर आम्हाला आत्मदहन करावे लागेल असा इशारा जिल्हा प्रतिनिधी पी.आर. कुलकर्णी यांनी दिला आहे.