श्री सिद्धेश्वर भक्तांसाठी पालकमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी
१ कोटींचा देणार निधी
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीमार्फत हा निधी दिला जाणार आहे.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची यात्रा म्हणजे सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. वक्फ बोर्डाचशी असलेल्या मतभेदामुळे श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून थांबले होते. मात्र यावर आता तोडगा निघाल्यामुळे हा रस्ता नव्याने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्री सिद्धरामेश्वर मंदिरासमोरील रस्ता सिमेंटचा बनवण्यात येणार असून यात्रेनंतर त्याचे काम सुरू होणार आहे. मात्र पुढील महिन्यात होणाऱ्या यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात सुव्यवस्थित करावा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्याचेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आज रविवारपासून या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचेही पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेतल्याने भाविकांची होणारी गैरसोय टळणार आहे. श्री सिद्धरामेश्वरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली यातच मला धन्यता वाटते, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.