अन्यथा 'या' मुलांना होईल हृदयविकार, कॅन्सर किंवा मृत्यूही !

सोलापूरातील नशा करणाऱ्या शाळकरी मुलांना रोखण्याची गरज

अन्यथा 'या' मुलांना होईल हृदयविकार, कॅन्सर किंवा मृत्यूही !

नशेच्या विळख्यात चिमुकले : भाग २

पुरुषोत्तम कारकल

सोल्यूशन कापडात टाकून तो बोळा तोंडासमोर धरून त्यातून हवा ओढून घेत नशा घेण्याचा शाळकरी मुलांचा प्रकार महाबातमी न्यूज पोर्टल ने शनिवारी उजेडात आणला. ही बातमी प्रसिद्ध होताच सोलापूरात खळबळ उडाली आहे. मात्र यापेक्षा गंभीर बाब म्हणजे नशेमुळे या मुलांना हृदयविकार, कॅन्सर इतकेच काय मृत्यूचाही धोका आहे, अशी माहिती कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.आर.वाय. पाटील यांनी दिली.

रिक्षाचे टप बसविण्यासाठी, फर्निचरच्या कामात सनमाईक बसविण्यासाठी, चप्पल, बूटला चिटकवण्यासाठी बॉण्ड एस आर 7 एक्स नावाचे केमिकल उपयोगात आणले जाते. यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे नशा होत असल्याचा शोध कोणीतरी लावला अन दुर्दैवाने सोलापूरातील चक्क शाळकरी मुले या नशेला बळी पडत आहेत.

याबाबत प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, अशा पदार्थांमध्ये असलेल्या ब्युटेन, फ्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स, ऍसिटॉन, बेंझीन, टॉलवीन, झायलीन आदी घटक असतात. हे घटक शरीरात तत्काळ शोषले जातात. हुंगल्यावर फुफ्फुसाद्वारे रक्तात लगेच मिसळून मेंदूपर्यंत पोहचवून त्वरित परिणाम करतात. याचा यकृत, हृदय, रक्तनलिका, मूत्रपिंड, त्वचा, अन्ननलिका आणि फुफ्फुसावर घातक परिणाम होतात. तोंड, श्वसननलिकेवर आघात होऊन रक्तस्त्राव होतो.

दीर्घकाळ याचे सेवन केल्यास तणाव, नैराश्य, स्मृतीभ्रंश, मतीभ्रम, वेडसरपणा असे परिणाम संबंधित व्यक्तीवर होतात. शिवाय तोतरेपणा, एकाग्रता न राहणे, चिडचिड, थरथरणे, श्रवणक्षमता मंदावणे अशा समस्यांनाही सामोरे जावे लागते.

सोलापूरात नशा करण्याच्या या अतिशय घातक प्रकाराला शाळकरी मुले बळी पडत आहेत. त्यामुळे सोलापूरकरांसमोर भविष्यात किती मोठे संकट वाढून ठेवले आहे याची कल्पना सहजासहजी येणार नाही. मात्र शाळकरी मुले नशा करण्याचे प्रमाण असेच वाढत राहिले तर सोलापूरकरांसाठी ती भयंकर संकटाची नांदी असणार आहे.

मृत्यूच्याही घडल्या घटना
अशा पदार्थांच्या पहिल्याच सेवनावेळी मृत्यूच्याही घटना देशात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे याला प्रतिबंध घालायचा असेल तर शासन आणि पोलिसांकडून यावर तत्काळ कारवाई होणे आवश्यक आहे.

येथे वापरण्यात आलेले छायाचित्र संग्रहित आहे.

(शाळकरी मुलांच्या नशेबाबत काय वाटतं सोलापूरकरांना ? वाचा उद्याच्या भाग ३ मध्ये)
----------------