सोलापूरकरांना धोक्याची घंटा !

चक्क १२ वर्षांची मुले करतायत 'ही' नशा

सोलापूरकरांना धोक्याची घंटा !

नशेच्या विळख्यात चिमुकले : भाग  १

पुरुषोत्तम कारकल

ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या अवघ्या १२ वर्षे वयाची मुले सोलापूरात नशा करताना आढळत आहेत. अतिशय गंभीर बाब म्हणजे फर्निचरच्या कामात उपयोगात येणाऱ्या आणि अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या केमिकलपासून ही मुले नशा करत आहेत.

नशा म्हणजे दारू, सिगारेट किंवा इतर मादक द्रव्ये असा सर्वसाधारणपणे म्हटले जाते. परंतु सोलापूरात चक्क सोल्यूशनपासून नशा करण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

लष्कर परिसरातील नळ बझार आणि परिसर या नशेच्या प्रकारचे मुख्य केंद्र बनले आहे.

रिक्षाचे टप बसविण्यासाठी, फर्निचरच्या कामात सनमाईक बसविण्यासाठी, चप्पल, बूटला चिटकवण्यासाठी बॉण्ड एस आर 7 एक्स नावाचे केमिकल उपयोगात आणले जाते. यात असलेल्या रासायनिक घटकांमुळे नशा होत असल्याचा शोध कोणीतरी लावला अन दुर्दैवाने सोलापूरातील मुले या नशेला बळी पडत आहेत.

हे केमिकल टॉवेलच्या तुकड्यात, कापडात टाकून तो बोळा तोंडासमोर धरून त्यातून हवा ओढून घेत नशा करणारी मुले सध्या सोलापूरात अनेक ठिकाणी दिसत आहेत. ही अतिशय धोकादायक बाब आहे.

पालकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, दुर्लक्षामुळे शाळेपासून दुरावलेली मुले लहानपणापासूनच कामाला जातात. त्यातून चार पैसे मिळू लागले कि अशा व्यसनाधीनतेकडे वळू लागतात. सोलापूरात याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. शहरातील अनेक भागांत अशी नशा करणारी मुले असून हे केमिकल कशाही प्रकारे मिळवून नशा करत आहेत. एकट्या लष्कर, नळ बझार, बेडर पूल परिसरात सुमारे २०० ते २५० मुले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

असे फुटले बिंग
बॅट तुटली आहे. ती चिटकवण्यासाठी बॉण्ड एस आर 7 एक्स हवे आहे असे सांगून काही मुले नेत असत. तीन - चार मुले पैसे गोळा करून नशा करीत असत. मुलांनी ते नेल्यामुळे दुकानदारांनाही शंका येण्याचे कारण नव्हते. मात्र एकेदिवशी त्या मुलांमध्ये नशा करण्यावरून भांडण झाले आणि त्यातील दोघांनी दुकानदाराला याबाबत सांगितले तेंव्हा या प्रकरणाचे बिंग फुटले.

इतक्या लहान मुलांनी नशा करणे प्रकारच अतिशय धोकादायक असून याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

या मुलांनी चोरले २४० डबे
काही दिवसांपूर्वी येथील एका दुकानात ही मुले बॉण्ड एस आर 7 एक्स मागण्यासाठी गेली असताना दुकानदाराने त्यांना ते न देता रागावून पिटाळले. त्याच दिवशी रात्री यापैकी काही मुलांनी दुकान फोडून तब्बल २४० डबे चोरून नेले. दुकानात तीन लाखांचा माल असताना चोरट्यांनी केवळ हे डबे आणि दोन हजार रुपये रक्कम पळविल्यामुळे दुकानदाराने सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता  यात हा प्रकार समोर आला.

न मिळाल्यास ब्लेड ने वार
नशा करणाऱ्या या मुलांना हे केमिकल मिळाले नाही तर ही मुले आक्रमक होतात. स्वतःच्याच शरीरावर ब्लेडने वार करून घेणे, प्रसंगी इतरांवर हल्ला चढविणे, चोऱ्या करणे असे प्रकार ही मुले करत आहेत.

नशा करण्यास न मिळाल्यामुळे ब्लेडने करून घेतलेले वार

(याचे गंभीर परिणाम वाचा उद्याच्या भाग २ मध्ये)
---------------------------------