खुशखबर ! सोलापूरात येणार आयटी पार्क
महेश कोठे यांची घोषणा : २ ऑगस्ट रोजी भूमीपूजन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूरातील पहिल्या आयटी पार्कची घोषणा माजी महापौर महेश कोठे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. आर्यन्स ग्रुपच्या माध्यमातून सोलापूरातील डोणगाव रस्त्यावरील ६५ एकर जागेमध्ये खा. शरद पवार यांच्या हस्ते २ ऑगस्ट रोजी या आयटी पार्कचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती माजी महापौर महेश कोठे आणि आर्यन्स ग्रुपचे सीईओ मनोहर जगताप यांनी सांगितले.
याबाबत महेश कोठे म्हणाले, यामध्ये आयटीसी संलग्न अशा विविध कंपन्या आणल्या जाणार आहेत. तसेच रोबोट तयार करणार्या कंपनीचा देखिल समावेश आहे. येत्या पाच ते सहा महिन्यात प्रत्यक्ष कंपनी सुरू होऊन १० ते १५ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी सोलापूरमध्ये उभारत असलेले हे अत्याधुनिक आयटी पार्क अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. यामुळे शहरात आयटी क्षेत्रातील उद्योगांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. या आयटी पार्कच्या माध्यमातून मोठ्या आयटी कंपन्या, आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्स, उद्योजक आणि याच्यांशी संबंधित उद्योगांना आकर्षित केले जाणार आहे. या माध्यमातून सोलापूर मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांसाठी एक पोषक वातावरण तयार होणार असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.
आयटी पार्क बरोबरच आर्यन्स ग्रुप आयटी क्षेत्रात काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर देखील काम करत आहे. कंपनी पूर्णतः भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनवणार आहे. कंपनीसाठी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. कारण गुगल किंवा इतर सर्च इंजिन देशाबाहेरील आहेत. ज्यामुळे भारताच्या दृष्टीने हा एक सुरक्षेचा विषय आहे. याबरोबरच कंपनी भारतीय बनावटीचे वेब ब्राउजर देखील बनवत आहे. जे पूर्णपणे सुरक्षित असेल. आयटीपार्कसह इतर प्रकल्पासाठी जागा मिळाल्यास ८०० कोटी पेक्षा जादा गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस कंपनीचे संचालक संजय शेंडगे, किरण लोहार, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, डॉ. सुर्यप्रकाश कोठे, विनायक कोंड्याल, कुमुंद अंकाराम, शशीकांत कैंची, विद्या लोलगे, दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळ्ये यांची उपस्थिती होती.
------------
मी केले तुम्ही करून दाखवा - महेश कोठे
भूमिपूजन झाल्यानंतर तीन महिन्यात सोलापूरच्या लोकांना इथे नोकरी मिळेल. पहिल्या टप्प्यात टेक्निकलच्या दीड हजार तर नॉन टेक्निकलच्या तीन हजार लोकांना सुरुवातीच्या वर्षांमध्ये काम मिळेल. तीन वर्षांमध्ये जवळजवळ १० ते १५ हजार रोजगारांच्या संधी मिळणार आहेत. मी गेली सहा वर्षाचे स्वप्न पूर्ण करत करून दाखवल आहे. आता मी केले आता इतर राजकीय पक्षाच्या लोकांनी करून दाखवा आणि शहराच्या विकासात भर घालण्याचे आवाहन महेश कोठे यांनी यावेळी केले.
--------------
आर्थिक विकासाला चालना : मनोहर जगताप
आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी शहरामध्ये आयटी पार्क उभारत आहोत. ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. शरद पवार त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रेरणेमुळे आम्हाला हे साध्य करणे शक्य झाले आहे. या आत्याधुनिक आयटी पार्कच्या माध्यमातून या भागात आर्थिक विकासाला चालना तर मिळणार आहेच, त्याबरोबरच रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होणार आहेत.
--- मनोहर जगताप, सीईओ, आर्यन्स ग्रुप सोलापूर