अन सोलापूरातील भिंती बोलू लागल्या !

देतायत पर्यावरण रक्षण अन स्वच्छतेचा संदेश

अन सोलापूरातील भिंती बोलू लागल्या !

सोलापूर : प्रतिनिधी

रस्त्याने आपण जाताना निर्जीव भिंती आपल्याशी बोलू लागल्या तर ? होय असेच काहीसे सोलापूरात घडतंय...! माझी वसुंधरा, स्वच्छ भारत आदींचा संदेश देत सोलापूरातील भिंती जणू नागरिकांशी बोलत आहेत.

सोलापूर महानगरपालिकेकडून शहरात काही मुख्य रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. यात चित्रकार आकाश कुरकुर आणि सुनिल कंटली आणि त्यांचा गट सात रस्ता येथील हॉटेल प्रथम च्या विरुद्ध बाजूकडील भिंतींवर पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी अतिशय उत्तम चित्रे साकारत आहेत.

झाडे लावा, झाडे जगवा, आपले शहर स्वच्छ ठेवा, पाणी वाचवा, वृक्षसंवर्धन अशा अनेक विषयांवर  प्रबोधनात्मक कलाकृती साकारत आहेत. त्यांच्या या कलाकृतींना नागरिकांचीही दाद मिळत आहे.

चित्रांच्या माध्यमातून निर्जीव भिंतींना जणू सजीव करून त्यांना  बोलते करण्याचा प्रयत्न या चित्रकार मंडळींकडून होत आहे.