बापरे ! सोलापूरचे डॉक्टर कश्मीरमध्ये शस्त्रक्रिया करताना त्याच गावात झाला दहशतवादी हल्ला !

न डगमगता रोटरीतर्फे डॉक्टरांनी केल्या १२३५ मोफत शस्त्रक्रिया

बापरे ! सोलापूरचे डॉक्टर कश्मीरमध्ये शस्त्रक्रिया करताना त्याच गावात झाला दहशतवादी हल्ला !

सोलापूर : प्रतिनिधी

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे रोटरीची टीम कार्यरत असताना शेवटच्या दिवशी लष्करी तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन मोठे अधिकारी हुतात्मा झाले. परंतु न डगमगता रोटरीतर्फे सोलापूर सह देशभरातून आलेल्या डॉक्टरांनी १ हजार २३५ मोफत शस्त्रक्रिया केल्याची माहिती रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान यांनी बुधवारी प्रसार माध्यमांना दिली.

रोटरी जिल्हा ३१३१ व ३१३१ यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोंपिया व कुळगाम या चार जिल्ह्यांमध्ये नुकतेच मोफत शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. याबाबत रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान यांच्यासह शिबिरात सहभागी डॉक्टरांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला.

या शिबिरात स्त्रियांचे आजार, अस्थिरोग, कान - नाक - घसा, डोळे, कर्करोग, प्लास्टिक सर्जरी आणि लहान मुलांच्या शस्त्रक्रिया तसेच इतर जनरल शस्त्रक्रियांचा समावेश होता. यापैकी अनेक शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीच्या होत्या. शिबिरामध्ये महाराष्ट्रातून व इतर राज्यांमधून ३० सर्जन आणि स्वयंसेवक सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातून डॉ. संजय मंठाळे, डॉ. शशिकांत गंजाळे, डॉ. असीत चिडगुपकर, डॉ. मीनल चिडगुपकर, डॉ. आनंद खडके, डॉ. मनोज भायगुडे आणि धनश्री केळकर सहभागी झाले होते. डॉ. मंठाळे यांनी कानाच्या व घशाच्या अवघड शस्त्रक्रिया पार पाडल्या. डॉ. गंजाळे व डॉ. असित चिडगुपकर यांनी पाठीच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया केल्या. अस्वलाच्या हल्ल्यात एक हात निकामी झालेल्या रुग्णावर डॉ. चिडगुपकर यांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. कातडीपासून हाडापर्यंत जखमी झालेला हात पूर्ववत करण्यात यश मिळाले. डॉ. खडके व डॉ. भायगुडे या दोघांनी डोळ्याच्या अनेक शस्त्रक्रिया शोंपीया व पुलवामा येथे केल्या. एका लहान मुलीवर तिरळेपणा दूर करण्यासाठीची शस्त्रक्रिया डॉ. भायगुडे यांनी केली. डॉ. मीनल चिडगुपकर यांनी शिबिरातील काही दिवस अनंतनाग ते पुलवामा असा ऐंशी मिनिटे प्रवास करून स्त्रियांच्या आजारावरील शस्त्रक्रिया पार पाडल्या. डॉ. धनश्री केळकर यांनी अनंतनाग येथील रोटरीच्या 'टीम' चे समन्वयक म्हणून काम केले.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रोटरीचे या शिबिराबद्दल कौतुक तर केलेच परंतु पुंछ व राजौरी या जिल्ह्यामध्ये असेच शिबिर भविष्यात घेण्याची विनंती केली. काश्मीरचा हा भाग अतिशय संवेदनशील समजला जातो . अनंतनाग येथे रोटरीची टीम कार्यरत असताना शेवटच्या दिवशी लष्करी तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन मोठे अधिकारी हुतात्मा झाले. पुलवामा आणि शोपिंया ही गावे आणि इतर गावांना जोडलेले रस्ते रात्री पूर्णपणे लष्कराच्या ताब्यात असतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रातील वैद्यकीय तज्ञांनी त्यांची सेवा देण्यासाठी धाडस दाखवले.

काश्मीर सरकारने या शिबिरासाठी महत्त्वाचे कार्य केले. काश्मीरच्या आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन दोन महिने रुग्णांची निवड केली. शस्त्रक्रियांसाठी लागणारी औषधे, साधनसामग्री राज्य सरकारने उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे काही उपकरणे, तसेच ऑपरेटिंग मायक्रोस्कोप सरकारने इतर जिल्ह्यातून शिबिरासाठी मागविले होते. जवळपास १०० रुग्णसेवक या शिबिरासाठी दिवस- रात्र काम करीत होते. या सर्व रोटरी टीम आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून या शिबिरात १२३५ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. काश्मीरमधील सर्व-सामान्य जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हे एक छोटेसे परंतु महत्त्वाचे पाऊल पडले, असेच म्हणावे लागेल. रोटरीची अशाप्रकारे देश-विदेशात २८ शिबिरे पार पाडणाऱ्या माजी प्रांतपाल डॉ. राजीव प्रधान यांच्या कुशल नेतृत्वामुळे हे यश मिळाले, असे रोटरीतर्फे सांगण्यात आले. यावेळी संदिप जव्हेरी उपस्थित होते.