बाप रे ! १० टक्के सोलापूरकरांना आहे मधुमेह

डॉ. भास्कर पाटील यांची माहिती : डायबेटीस फूट केअरतर्फे रविवारी तपासणी व मार्गदर्शन शिबीर

बाप रे ! १० टक्के सोलापूरकरांना आहे मधुमेह

सोलापूर : प्रतिनिधी

भारतात दर १० व्यक्तींमागे एक मधुमेही रुग्ण आहे. तेच प्रमाण सोलापूरातही लागू आहे. सोलापूरच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के म्हणजेच सुमारे एक लाख जणांना मधुमेहाचे निदान झालेले असून तितक्याच व्यक्ती निदान न झालेल्या पण मधुमेह असलेल्या आहेत असा दावा प्रख्यात मधुमेह तज्ञ डॉ. भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

मधुमेह रोगाबाबत जनजागृती आणि त्यावर वेळीच योग्य उपचार व्हावे या उद्देशाने डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटरच्या वतीने जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने रविवार, १३ नोव्हेंबर रोजी मधुमेह तपासणी आणि मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.  डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटर मोदी रेल्वेलाईन यतीराज हॉटेल जवळ सोलापूर येथे शिबिर होणार आहे. सकाळी १० पासून दिवसभर चालणाऱ्या या शिबिरात नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

भारतात सुमारे साडेसात कोटी लोकांना मधुमेहाची लागण झालेली आहे. २०२४ पर्यंत ही संख्या साडे तेरा कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ज्याला मधुमेह आहे त्याला कोणतातरी दुसरा आजार झाल्याशिवाय मधुमेह आपल्याला आहे याची माहितीच नसते. म्हणून प्रत्येकाने वेळेवर आपल्या रक्ताची, शरीराची तपासणी करणे गरजेचे आहे. दि. १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटर यांच्यावतीने मधुमेह तपासणी तसेच मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. भास्कर पाटील डायबेटीस फूट केअर आणि सोलापूर डायबेटीस केअर सेंटरच्या वतीने मधुमेह रुग्णांची संख्या कमी कशी करता येईल आणि ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांच्यावर उपचार करून मधुमेह नियंत्रणात कसा आणता येईल, यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.  त्याचाच भाग म्हणून जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने हे शिबिर होणार आहे.

रविवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार aah. यानंतर दिवसभर टाईप १ आणि टाईप २ या मधुमेह रुग्णांसाठी त्यांची रक्तातील साखर, रक्तदाब, वजन, उंची, बीएमआय, पायांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच व्यायाम, योगासन, आहार व पाककलेचे मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी आहार तज्ञ मनाली काणे, ज्योती पाटील आणि योग तज्ज्ञ धनंजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन होणार असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

या शिबीरात येणाऱ्या प्रत्येकासाठी अल्पोपहार आणि करमणुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही रुग्णांना बक्षिसही देण्यात येणार आहे. या शिबीरासाठी दि. ११ नोव्हेंबर पर्यंत ९८२२२६२१२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, असे डॉ. भास्कर पाटील आणि डॉ. ज्योती पाटील यांनी सांगितले.