वरूणराजाच्या आगमनाने सोलापूरकर सुखावले
किती दिवस राहणार पाऊस ? वाचा !
सोलापूर : प्रतिनिधी
तब्बल ४२, ४३ अंश सेल्सिअसच्या उन्हाच्या जबरदस्त तडाख्यानंतर सोलापूरकर ज्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते असा वरूणराजा शनिवारी दुपारी बरसला. विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट अशा वातावरणात धो धो बरसणाऱ्या पावसाला पाहून सोलापूरकर सुखावले. पावसाची सर्वाधिक प्रतीक्षा करणारा शेतकरीराजा मात्र या पावसामुळे अक्षरशः नाचू लागला.
शनिवारी दुपारी ३.३० च्या सुमारास शहरात पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी हलक्या पडणाऱ्या सरांचे रूपांतर काही वेळातच मोठ्या पावसात झाले. अन् वीस मिनिटातच शहरातील रस्ते पावसाच्या पाण्याने भरून गेले.
नोकरदार व्यवसायिकांची या पावसामुळे काहीशी धावपळ झाली असली तरी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मात्र या पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
दरम्यान, सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पुढील काही दिवसात येणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात २४ जून पासून सक्रिय झालेला मान्सून ३ जुलै पर्यंत असणार आहे. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या कालावधीमध्ये विदर्भातील पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जोरदार पाऊस होणार असं त्यांनी सांगितले आहे. या कालावधीत एवढा पाऊस पडणार की नदी नाले ओसांडून वाहतील.
पेरणीसाठी पुन्हा एकदा शेतकरी बांधव नवीन जोमाने कामाला लागणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी पेरणी करताना किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने आणि कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिला आहे, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.