छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव उत्साहात

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा उपक्रम

छत्रपती शिवरायांच्या चरणी दीपोत्सव उत्साहात

सोलापूर : प्रतिनिधी

कार्तिक पौर्णिमेनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सोलापूर विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात आला. रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात हा उपक्रम झाला.

प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या पायाशी आणि परिसरात शेकडो पणत्या प्रज्वलित करून परिसर उजळवला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी प्रणितराव मांडवकर यांनी धारकऱ्यांना आणि सोलापूरकरांना मार्गदर्शन केले. दुर्गराज श्री रायगडावर बसविण्यात येणाऱ्या ३२ मण सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा या विषयावर त्यांनी विस्तृत माहिती दिली. तसेच कार्तिक पौर्णिमा व छत्रपती श्री शिवाजी महाराज या विषयावरही श्री. मांडवकर यांनी मार्गदर्शन केले.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सर्वत्र पणत्या लावण्यात आल्यामुळे उद्यान परिसर उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी दिवा लावण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

ध्येयमंत्राने दीपोत्सवाची सांगता झाली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------