डीआरडीओ चे संशोधन केंद्र सुरू होऊ शकते सोलापूरात !
संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड यांनी दिला दुजोरा
सोलापूर : प्रतिनिधी
भारत सरकारच्या डीआरडीओचे (रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन) संशोधन केंद्र सोलापुरात सुरू होण्याच्या शक्यतेला संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सोलापूरचे सुपुत्र सुशील गायकवाड यांनी दुजोरा दिला. याकरिता माझ्याकडून जे काही शक्य होईल ते सर्व प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालक सुशील गायकवाड सोलापुरात तीन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर आहेत. यावेळी गुरुवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात श्री. गायकवाड यांनी हजेरी लावत पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी श्री. गायकवाड यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.
भारत सरकारच्या डीआरडीओचे ( रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन) संशोधन केंद्र सोलापुरात सुरू झाल्यास सोलापूरचे नाव पुन्हा एकदा भारताच्या नकाशावर ठळकपणे दिसणार आहे. तसेच या संशोधन केंद्राच्या माध्यमातून किमान चार ते पाच हजार जणांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोलापुरात सैन्य दलाच्या मोकळ्या जागांवर सैन्य भरती केंद्रही सुरू करता येऊ शकते याबाबतदेखील सकारात्मक मत व्यक्त करताना त्यांनी सर्व स्तरातून प्रयत्न झाल्यास हे करता येऊ शकत असल्याचे सांगितले.
मूळ रेल्वे विभागाचे अधिकारी असलेल्या सुशील गायकवाड यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचे कार्यकारी संचालकपद आहे. संरक्षण मंत्रालय आणि रेल्वे विभागाचा समन्वय अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने सोलापूरला संशोधन केंद्र सुरू करता येऊ शकते का? याबाबत पत्रकारांनी विचारले असता श्री. गायकवाड यांनी त्यावर उत्तरे दिली.
संरक्षण क्षेत्रातील वस्तू निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत पूर्वी मागे असलेला भारत देश आता पहिल्या २५ देशांच्या यादीत आल्याचे स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या जागतिक पाहणी अहवालात दिसून आले आहे, असेही श्री. गायकवाड यांनी सांगितले.
सैन्यदलाच्या जवानांचे गणवेश सोलापूर शहरातील कामगारांकडून घेता येऊ शकतात असा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला होता. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही सकारात्मक निर्णय झालेला दिसत नाही. याबाबत विचारले असता सैन्य दलाच्या गणवेशासाठी एनटीसी कडूनच कापड घ्यावे असे सरकारी धोरण आहे. मात्र याबाबत माहिती घेईन असेही श्री. गायकवाड यांनी याप्रसंगी सांगितले.