स्वातंत्र्याची पंचाहत्तरी हा चिंतन करण्याचा अमृतकाळ

प्रमोद बापट : जनता बँक बौद्धिक व्याख्यानमाला

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी हा चिंतन करण्याचा अमृतकाळ

सोलापूर : प्रतिनिधी

आधुनिक भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाली. भारताच्या झालेल्या आणि बाकी राहिलेल्या प्रगतीचे चिंतन करण्याचा हा अमृत काळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट (मुंबई) यांनी केले. जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत ते बोलत होते.

'स्वराज्याचा अमृत महोत्सव' या विषयावर श्री. बापट यांनी शुक्रवारी व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले. श्री. बापट म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पिढीला कदाचित स्वातंत्र्याचे मोल कळणार नाही. परंतु कोणते मोल चुकवून पूर्वीच्या पिढ्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, याची माहिती पुढील पिढ्यांना उजळणी करून सांगितली पाहिजे.

स्वातंत्र्याची लढाई १९४७ च्या काही शतके आधीपासून सुरू होती. परकीय आक्रमकांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संतांनी समाजाला पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने एका दिशेने, एका सुरात जयघोष करीत चालायला शिकवले. त्याची परिणीती छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात झाली. इ. स. १६७४ साली दुर्गराज श्री रायगडावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे देशाचा स्वातंत्र्य दिनच होता.

भारताच्या आधुनिक स्वातंत्र्यलढ्यातही हजारो भारतीयांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले. पुनर्जन्म घेऊन क्रांतीकारांना पुन्हा भारतमातेच्या सेवेसाठी येण्याची इच्छा असणे हे स्वातंत्र्याचे मोल आहे. स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करताना देशात आजही अनेक पाणवठे, अनेक मंदिरे, स्मशानभूमी सर्व जातींसाठी खुली नाहीत. त्यावेळीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यासाठी आंदोलन करावे लागले. आजही अनेक ठिकाणी तशीच स्थिती आहे. यावर गंभीर चिंतन करण्याचा हा काळ आहे, असेही श्री. बापट यांनी सांगितले.

भारताचे आजवर ३२ वेळा लचके तोडले गेले. १५ ऑगस्ट रोजीही स्वातंत्र्य मिळताना भारताचे दोन तुकडे पाडले गेले. आपल्या हजारो माणसांना मरायला सोडून दिल्याप्रमाणे स्थिती होती. स्वातंत्र्याचे स्मरण करताना त्या बांधवांच्याही आठवणींची ज्योत आपल्या मनात तेवली पाहिजे, असे श्री. बापट यावेळी म्हणाले.

महेश पाटील यांनी प्रास्ताविक आणि यांनी सूत्रसंचालन केले. तर अक्षय सुरवसे यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक प्राचार्य गजानन धरणे, आनंद कुलकर्णी, सहाय्यक सरव्यवस्थापक मकरंद जोशी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नितीन कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, व्याख्यानमाला समितीचे प्रमुख मदन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
...........................
ऋषी बंकिमचंद्रांचे चरित्र वाचण्याची आवश्यकता

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली परंतु इतक्या वर्षात 'वंदे मातरम' चा मंत्र भारतीयांना देणाऱ्या ऋषी बंकिमचंद्रांचे एकही चरित्र मराठी भाषेत प्रकाशित झाले नव्हते. ते यंदाच्यावर्षी झाले आहे. हे चरित्र प्रत्येकाने आवर्जून वाचले पाहिजे, असे आवाहनही श्री. बापट यांनी यावेळी केले.
.............
उद्याचे व्याख्यान
शनिवार, ३ सप्टेंबर २०२२
स्थळ : हुतात्मा स्मृती मंदिर
वेळ : सायं. ६.३० वाजता 
वक्ते - निवृत्ती न्यायमूर्ती अंबादास जोशी, पणजी
विषय - न्यायालये, न्याय व समाज
---------