सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनानंतर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

विमानतळाचे दृकश्राव्य प्रणालीद्वारे झाले उद्घाटन

सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनानंतर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ?

सोलापूर : प्रतिनिधी 

सोलापुरातून सुरू होणाऱ्या विमान सेवेमुळे सोलापूरच्या व्यापार - उदीम, पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. सोलापूर विमानतळाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथून दृकश्राव्य प्रणालीद्वारे केले.

पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनासह पुणे मेट्रो व अन्य पायाभूत प्रकल्पांचा दृकश्राव्यप्रणालीद्वारे पायाभरणी, लोकार्पण आणि उद्घाटन समारंभ झाला. या कार्यक्रमास राज्यपाल पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, श्री विठ्ठलाच्या कृपेमुळे आशीर्वाद मिळाला आहे. थेट सोलापूरहुन आता  हवाई प्रवास करणे सोपे झाले आहे. सोलापूर विमानतळावरती नव्या सुविधा, टर्मिनल क्षमता वाढविण्यात आली आहे. भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोलापूरला विमानाने येता येईल. सोलापुरातील व्यापार, पर्यटनालाही चालना मिळेल.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनामुळे उद्योजकांची तसेच प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. दरवर्षी ४ लाख १० हजार प्रवासी क्षमता असलेले हे विमानतळ सोलापूरच्या विकासाला उपयुक्त ठरेल, असेही श्री. मोहोळ म्हणाले.

दरम्यान सोलापूर विमानतळ उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी सोलापुरातील मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. सोलापूर विमानतळावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल केली यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले यानंतर उपस्थितांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उद्घाटनाचा सोहळा पाहिला. या कार्यक्रमास माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी आमदार नरसिंग मेंगजी आदी उपस्थित होते.