जेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकच चक्क ट्रॅक्टरवर बसून करतात स्वच्छता.....!

गुन्हेगारीच्या सफाई बरोबरच होत आहे पोलीस ठाण्यातीलही सफाई !

जेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षकच चक्क ट्रॅक्टरवर बसून करतात स्वच्छता.....!

सोलापूर : प्रतिनिधी

पोलीस ठाणे म्हटले नागरिकांची आपसातील भांडणे, चोऱ्या, खून, दरोडे आणि यातून तिथे असणारा रोजचाच गोंधळ.... परंतु आज शनिवारी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगळेच चित्र दिसून आले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी चक्क ट्रॅक्टरवर बसून पोलीस ठाण्याच्या आवारातील गवत अन् कचरा काढून स्वच्छता केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने हे जनतेत मिसळून जनतेशी अत्यंत चांगला संवाद साधून काम करण्यासाठी ओळखले जातात. चांगली पोलिसिंग करण्याबरोबरच काही चांगले उपक्रमही राबवावेत या हेतूने श्री. माने यांनी पुढाकार घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या स्वच्छता मोहिमेची कल्पना सहकारी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर मांडली. सर्वांनी या संकल्पनेला उचलून धरत त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला आणि काही वेळातच स्वच्छतेस सुरुवातही झाली.

पोलीस ठाण्याच्या आवारातील गवत, कचरा काढण्यात आला. हे काम करण्याचे प्रमाण कर्मचाऱ्यांना न सोडता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने हे स्वतःच ट्रॅक्टरवर बसले आणि त्यांनी गवत काढण्याच्या कामास सुरुवात केली. आपल्या अधिकाऱ्यांचा हा उत्साह आणि स्वच्छते बद्दलची सामाजिक जाणीव पाहून सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मोठ्या हिरहिरीने स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन पोलीस ठाण्याची स्वच्छता केली.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात यापूर्वीच आंबा, पपई, शेवगा, पेरू, चिकू, लिंबू, नारळ आदी झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांच्या फांद्यांची आवश्यक छाटणीही यावेळी करण्यात आली. काही दिवसात या ठिकाणी भाजीपालाही लावण्याचे नियोजन असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी 'महाबातमी न्यूज पोर्टल' ला सांगितले.

या स्वच्छता मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, पोलीस अंमलदार प्रकाश लोहार, संतोष सुर्वे, संतोष गुळवे, गणेश कानडे, अनिता चव्हाण, पपीतादेवी पात्रे, अश्विनी लोकरे, निलोफर मड्डी आदी २५ कर्मचारी सहभागी झाले होते.
-------------
पोलीस ठाणे म्हणजे आपले घरच

मी जिथे काम करतो ते पोलीस ठाणे म्हणजे माझे घरच आहे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसे पोलीस ठाणेही स्वच्छ ठेवले पाहिजे या भावनेतून ही स्वच्छता मोहीम आज राबविण्यात आली. कोणी रडत तर कोणी रागाच्या भरात तर कोणी चिंताग्रस्त होऊन पोलीस ठाण्यात येतात. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना आणि त्याचबरोबर पोलीस ठाण्यात दैनंदिन काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही परिसर स्वच्छ, नीटनेटका दिसावा यासाठी याकरिता हा उपक्रम झाला. स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशभरात सुरू आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून ही स्वच्छता झाली.
--- राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर

व्हिडीओ