दोनशेहून अधिक आमदार विजयी करण्यासाठी सज्ज व्हा !

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना आवाहन

दोनशेहून अधिक आमदार विजयी करण्यासाठी सज्ज व्हा !

सोलापूर : प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा सर्व निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवणे हे भाजपाचे ध्येय आहे. महाराष्ट्रातून आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व ४८ खासदार आणि विधानसभा निवडणुकीत २०० हून अधिक आमदार निवडून आणण्यासाठी भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा आयोजित महाबैठकीस गुरुवारी सायंकाळी हेरिटेज लॉन येथे श्री. बावनकुळे यांनी संबोधित केले.

संघटनात्मक कार्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यात राज्यातील शेवटची बैठक त्यांनी शुक्रवारी सोलापूर शहर व जिल्ह्याची घेतली. यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, खा. रणजीतसिंह नाईक - निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते - पाटील, आ. राजेंद्र राऊत, आ. राम सातपुते, आ. समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजप प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत पावस्कर, जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, विशेष निमंत्रित सदस्य उदयशंकर पाटील, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनिष देशमुख, प्रदेश कार्यकारणी सदस्य शंकर वाघमारे, प्रदेश कार्यकरिणी सदस्य नरेंद्र काळे, संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, जयवंत थोरात, धैर्यशील मोहिते - पाटील, शशिकांत चव्हाण 
आदी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, बूथ प्रमुख हा भाजप पक्षाचा आत्मा आहे. जितका बूथ सक्षम असेल तितके यशाचे प्रमाण वाढते. २०३५ पर्यंत आत्मनिर्भर भारत करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केलेला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून देशाच्या विकासाच्या कार्यात आपला वाटा उचलावा, असे आवाहन ही प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांनी यावेळी केले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रास्ताविक तर जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भाजपाचे शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दुपारी सामाजिक एकत्रीकरण बैठकीस हजेरी लावली. पारधी समाज गेल्या अनेक वर्षांपासून उपेक्षित राहिला आहे. पारधी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सरकार दरबारी प्रश्न मांडणार आहे. पारधी समाजाच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, पारधी समाज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठी समाजाचा विकास करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. शुक्रवारी भाजप युवा वॉरियरच्या शाखेचे उद्घाटन बलिदान चौकात प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विजयपूर रस्त्यावरील इंदिरानगर येथील आदर्श बूथला भेट देऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक केले.
------------
सरल ॲपद्वारे पोहोचवा विकासकामे

केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना, भारताचा होणारा विकास अशी अत्यंत उपयुक्त माहिती असलेले सरल ॲप प्रत्येक विधानसभेतील ६० हजार नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
-------------
नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सिद्धाराम खजूरगी, मन्सूर गांधी,  दक्षिण सोलापूर काँग्रेसचे पंकज पाटील, माजी उपमहापौर राजेश काळे यांचा भाजप पक्ष प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उपरणे देऊन करण्यात आला.